मोबाईलच्या नादात मैदानी खेळांकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:00+5:302021-03-06T04:28:00+5:30
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पालकांनी आपल्या मुलांना घराबाहेर निघण्यास मनाई केली आहे. शिवाय चौथी पर्यंतच्या शाळा अद्याप ...

मोबाईलच्या नादात मैदानी खेळांकडे पाठ
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पालकांनी आपल्या मुलांना घराबाहेर निघण्यास मनाई केली आहे. शिवाय चौथी पर्यंतच्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नसल्याने ही मंडळी घरातच आहे. अशात आपला वेळ घालविण्यासाठी या लहान मुलांकडून सतत मोबाईलचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत लहान मुले आता मोबाईलवरच लागून असल्याच्या तक्रारीही पालक करीत आहेत. घराबाहेर जाऊ देत नाही तर घरात राहून मोबाईलवर गेम खेळण्यात ते आपला दिवस घालवित आहेत. विशेष म्हणजे, मागील मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा उद्रेक सुरू असून तेव्हापासूनच पालकांची डोकेदुखी वाढली आहे. मोबाईल हे आजच्या जीवनात मूलभूत गरजांमध्ये येते. मात्र त्याचा वापर कामासाठी सोडून ही लहान मुले गेम खेळण्यासाठी करीत आहेत. सातत्याने मोबाईलवर लागून असल्यामुळे लहान मुलांमध्ये डोकेदुखी व डोळ्यांचे आजार वाढत आहेत. शिवाय मानसिक त्रासही होत आहे. मात्र पालकांचे न ऐकता लहान मुले दिवसभर मोबाईलवर लागून राहत असल्याने पालकांची डोकेदुखी वाढली आहे.
------------------------
लहान मुलांची प्रतिक्रिया ()
घराबाहेर जाता येत नसल्याने आम्हाला घरातच कोंडून रहावे लागत आहे. अशात दिवसभर टीव्ही बघूनही कंटाळा येतो म्हणून मोबाईलवर नवनवीन गेम खेळून आपला दिवस घालवितो.
- श्रेयश गणवीर, (बिरसी)
आम्हाला घराबाहेर जाऊ देत नसल्याने मित्रांसोबत खेळता येत नाही. घरात टीव्ही बघावा लागतो. तसेच मोबाईलवर नवनवीन गेम येत असल्याने चांगला टाईमपास होतो.
- आर्या वाढई (गोंदिया)
-------------------------------
पालकांची प्रतिक्रिया
कोरोनामुळे आम्ही मुलांना घराबाहेर निघण्यास मनाई केली आहे. शिवाय आता शाळा उघडलेल्या नाही. त्यामुळे मुले घरीच आहेत. अशात मात्र त्यांना दिवसभर मोबाईलवर गेम खेळण्याची सवय लागली आहे.
- राजेश देशमुख (आबूटोला)
आता शाळांना सुट्या आहेत व घराबाहेर निघणे धोकादायक असल्याने मुले घरीच आहेत. यामुळे दिवस घालविण्यासाठी ते मोबाईलवर गेम खेळतात. मात्र आता ते दिवसभर मोबाईलवरच लागून राहत आहेत.
- विवेक जगताप (गोंदिया)
-------------------------------
मोबाईलवर सतत लागून राहिल्याने पापण्या मारणे कमी होते व त्यामुळे डोळे शुष्क होऊन त्यात पाणी येते. शिवाय मुलांना कमी नंबरचा चष्मा असल्यास मोबाईलच्या सततच्या वापरामुळे त्यांचा नंबर झपाट्याने वाढू शकतो. मोबाईलवर सतत लागून राहिल्याने डोकेदुखीचा त्रासही होतो.
- डॉ. कविता एस. भगत
नेत्र तज्ज्ञ, गोंदिया
-------------------------
मोबाईल सतत वापरणे हे एक प्रकारचे व्यसन आहे. सध्या लहान मुले मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादी लागले आहेत. हा प्रकार धोकादायक आहे. अशात त्यांच्याकडून मोबाईल घेतल्यास ते चिडचिड करतात, उदास राहतात, दुसऱ्या कामात त्यांचे मन लागत नाही. याकरिता पालकांनी लहान मुलांना मोबाईल देऊ नये. दिल्यास अर्धा तासापेक्षा जास्त वेळेसाठी मोबाईल देऊ नये.
-डॉ.शिबू आचार्य
मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.
-------------------------
ज्येष्ठ व्यक्ती
आमच्यावेळी मोबाईल व टीव्ही हे सर्व नव्हते. तेव्हा आम्ही विटीदांडू, कंचे किंवा मैदानात जाऊन अन्य खेळ खेळत होतो. मात्र आता मोबाईल आल्यापासून लहान-लहान मुलेही घराबाहेर न निघता मोबाईलवरच लागून राहतात. यामुळे मुले आता मैदानात खेळताना दिसून येत नाही. मोबाईलमुळे लहान मुलांना आपल्या पारंपरिक खेळांचा विसर पडला आहे. यामुळे मुले नाजूकही होत आहेत.
- बिरबल माने, मरारटोला
--------------------------
कोरोनामुळे वाढले मोबाईल गेमचे फॅड
मागील मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे व तेव्हापासूनच शाळाही बंद पडल्या आहेत. शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे पालक आपल्या मुलांना घराबाहेर पाठवित नाही. अशात मुलांना घरात राहून कंटाळा येत असल्याने ते पालकांचे मोबाईल वापरत आहेत. मोबाईलवर गेम खेळत ते आपला दिवस घालवत आहेत. विशेष म्हणजे,कोरोना काळात मोबाईल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात मात्र लहान मुले मैदानी खेळांकडे दुर्लक्ष करीत आहेत.