वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:00 AM2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:41+5:30

या महिलेचे एक अपत्य असून तिची पूर्वी सिझर शस्त्रक्रिया झाली आहे. तिला प्रसव वेदना होत असताना आणि आधीच तिचे सिझर झाले आहे हे डॉक्टरांना सांगून सुध्दा बीजीडब्ल्यू रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी नार्मल प्रसूती होण्याची वाट पाहण्यास सांगितले. यात बराच वेळ निघून गेला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास या महिलेची प्रसूती झाली मात्र मृत बाळ जन्माला आले. याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना होताचा त्यांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.

The baby died due to untimely treatment | वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ दगावले

वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ दगावले

Next
ठळक मुद्देरुग्णाच्या कुटुबीयांचा आरोप : बीजीडब्ल्यू रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील अनागोंदी कारभाराच्या तक्रारीत वाढ झाली आहे. बुधवारी (दि.२६) एका गर्भवती महिलेला येथील डॉक्टरांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचा प्रकार उडघकीस आला. हे प्रकरण ताजे असताना एका प्रसूतीग्रस्त महिलेवर वेळेवर उपचार न करण्यात आल्याने तिचा बाळ दगावल्याचा प्रकार गुरूवारी (दि.२७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला. यावरुन रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करित तेथील कार्यरत डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
प्राप्त माहितीनुसार शहरातील झोपडी मोहल्ला येथील एका महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्याने तिला प्रसूतीसाठी गुरूवारी सकाळी प्रसूतीसाठी बीजीडब्ल्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेचे एक अपत्य असून तिची पूर्वी सिझर शस्त्रक्रिया झाली आहे. तिला प्रसव वेदना होत असताना आणि आधीच तिचे सिझर झाले आहे हे डॉक्टरांना सांगून सुध्दा बीजीडब्ल्यू रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी नार्मल प्रसूती होण्याची वाट पाहण्यास सांगितले. यात बराच वेळ निघून गेला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास या महिलेची प्रसूती झाली मात्र मृत बाळ जन्माला आले. याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना होताचा त्यांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. तसेच याची माहिती नगरसेवक पंकज यादव यांना दिली. त्यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयात पोहचत रुग्णालयाचे अधीक्षक आणि डॉक्टरांना याचा जाब विचारला. याला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करुन रुग्णालयातील अनागोंदी कारभार सुधारण्यास सांगितले. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून बीजीडब्ल्यू रुग्णालयात बराच अनागोंदी कारभार असून कोविडच्या नावावर गर्भवती महिलांना दाखल करुन घेण्यास नकार दिला जात आहे. यामुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहे. तर गोरगरीब रुग्णांची परवड होत असल्याचे चित्र आहे.

गरज ३५० परिचारिकांची कार्यरत केवळ ९१
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात एकूण ३५० परिचारीकांची पदे मंजूर आहेत.मात्र यापैकी सध्या स्थितीत केवळ ९१ परिचारिका कार्यरत आहे. त्यातच कोविडसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.तर रिक्त पदे भरण्यास शासनाकडून विलंब केला जात असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. त्यामुळे काम करायचे तर कसे असा प्रश्न आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

बीजीडब्ल्यूचा परिचारिकांचा स्टॉफ हलविण्याचे आदेश
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून बीजीडब्ल्यू रुग्णालयात दररोज रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर,परिचारिकांची आवश्यकता आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे यांनी येथील ३२ परिचारिकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होण्याचे आदेश दिले.त्यामुळे बीजीडब्ल्यृू रुग्णालयात कार्यरत परिचारिकांवर ताण निर्माण झाला.त्यामुळे परिचारिकांनी सुध्दा या प्रकारावर संताप व्यक्त केला.

बीजीडब्ल्यू रुग्णालयात झालेला बाळाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झालेला नाही.त्यांनी वेळेवर उपचार केले.कोविड वार्डात ड्युटी लावण्यासाठी काही परिचारिकांची नियुक्ती करण्याचे पत्र अधीक्षकांना दिले होते. परिचारिकांची पदे रिक्त असल्याने कोविडच्या कालावधीत समस्या वाढली आहे.
- डॉ.व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: The baby died due to untimely treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.