महाशिवरात्री यात्रेत भाविकांची गैरसोय टाळावी
By Admin | Updated: February 16, 2015 00:05 IST2015-02-16T00:05:25+5:302015-02-16T00:05:25+5:30
महाशिवरात्रीनिमित्त प्रतापगड येथील यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळावी. त्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन भाविकांची काळजी घ्यावी, ...

महाशिवरात्री यात्रेत भाविकांची गैरसोय टाळावी
गोंदिया : महाशिवरात्रीनिमित्त प्रतापगड येथील यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळावी. त्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन भाविकांची काळजी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे मंगळवारी १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महाशिवरात्री यात्रा आणि ख्वाजा हारुनी ऊर्सच्या निमित्ताने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा पालकमंत्री बडोले यांनी सदर बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
सभेला उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, माजी आ. दयाराम कापगते, जि.प. अर्थ व बांधकाम समिती सभापती प्रकाश गहाणे, पंचायत समितीचे सभापती तानेश ताराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, तहसीलदार संतोष महाले, गटविकास अधिकारी कोरडे, प्रतापगडचे सरपंच येशुकला कुंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, प्रतापगडच्या यात्रेला जिल्ह्यातून व बाहेर जिल्ह्यातून लाखो भाविक येतात. यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. त्यामुळे पाण्यापासून होणारे आजार यात्रेदरम्यान टाळण्यास मदत होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बंद असलेली पाणी पुरवठा योजना यात्रेपूर्वी सुरू करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. यात्रेदरम्यान पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यास भाविकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल.
पहाडावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने संबंधित विभागाने दुरुस्ती करावी असे सांगून ते म्हणाले, या रस्त्यामुळे मंदिरापर्यंत भाविकांना लवकर पोहोचता येईल. आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर आणि मेडीक्लोर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. भाविकांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी. अॅम्बुलन्ससेवा तसेच वैद्यकीय पथके यात्रेदरम्यान सक्रियतेने कार्यरत ठेवावे. स्वाईन फ्ल्यूबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
भाविकांना आणणाऱ्या बसेस, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर तसेच दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात येईल त्या ठिकाणी पार्किंगचे बोर्ड लावावे. यात्रेमध्ये लावण्यात येणारी दुकाने व्यवस्थित ठिकाणी लावण्याबाबत संबंधित दुकानदारांना निर्देश द्यावे. तसेच यात्रेदरम्यान परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. ग्रामपंचायत मार्फत मोबाईल शौचालय तसेच महिलांकरिता मूत्रीघरांची व्यवस्था करावी. पहाडावरील मंदिराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
यात्रेदरम्यान परवानगीशिवाय साऊंड सिस्टिम लावू देवू नये. लाऊडस्पीकरचा आवाज आवाश्यक तेवढ्या डेसीबलमध्ये असावा. त्यामुळे ध्वनीप्रदूषण टाळण्यास मदत होईल. अन्न व औषध प्रशासन विभागाने महाप्रसादाची व भंडाऱ्याची तपासणी करूनच भाविकांना द्यावे. यात्रेदरम्यान दारू पिणाऱ्या व्यक्तींवर पोलीस विभागाने कारवाई करावी. कृषी विभाग, आरोग्य विभाग व समाजकल्याण विभाग यांनी आपल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती भाविकांना व्हावी यासाठी स्टॉल लावावे. यात्रेदरम्यान वीज पुरवठा खंडित होणार नाही, याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
विविध यंत्रणांनी यात्रेदरम्यान करण्यात येणाऱ्या उपाययोजना व करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती सभेत दिली. सभेला वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी हरिश कळमकर, समाजकल्याण सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागप्रमुख, वनविभाग, सिंचन विभाग, पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग तसेच यात्रेसंबंधित इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संचालन व आभार प्रतापगडचे सेवक एल.के. बागडे यांनी केले. (प्रतिनिधी)