हवन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:11+5:30
मागील १३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे आंदोलन सुरू आहे. कधी झाडावर चढून, कधी भीक मागून तर कधी अर्धनग्न होऊन हे शिक्षक आपली मागणी सरकारच्या कानापर्यंत पोहचवून मंजुरीसाठी लढत आहेत.

हवन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन सुरू असताना अचानक शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड करून उग्र झालेल्या शिक्षकांनी गुरूवारी (दि.२२) शांतीचा मार्ग अवलंब करीत हवन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. दरदिवशी काही वेगळे करून सुरू असलेले हे आंदोलन सध्या चर्चा व उत्सुकतेचा विषय ठरत आहे.
मागील १३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे आंदोलन सुरू आहे. कधी झाडावर चढून, कधी भीक मागून तर कधी अर्धनग्न होऊन हे शिक्षक आपली मागणी सरकारच्या कानापर्यंत पोहचवून मंजुरीसाठी लढत आहेत. त्यानंतरही काही फायदा न झाल्याने काही कारणातून उग्र झालेल्या शिक्षकांनी मंगळवारी (दि.२०) शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड करून आंदोलनाला वेगळेच वळण आणले होते. अशात आता हे शिक्षक काय करणार याबाबत नजरा लागून असतानाच आंदोलनाच्या १४ व्या दिवशी गुरूवारी (दि.२२) या शिक्षकांनी हवन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी कृती समितीचे प्रा. के.बी. बोरकर, प्रा.पी.पी. मेहर, व्ही.आर. पोगळे, जे.बी.पटले, ए.एन. कठाणे, आर.एस. जगणे, एस.डी.येळे, एम.टी. चौरे, एम.ए. उके, एम.एल. पटले, प्रविण मेंढे यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.