एटीएमची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:14+5:30
मागीलवर्षी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडल्याची घटना होती. तर आंध्रप्रदेशातील एका एटीएममध्ये एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने सर्व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश बँका व्यवस्थापनाला दिले होते. मात्र न्यायालयाच्या या आदेशाची बँका आणि कंपन्याकडून सर्रासपणे पायमल्ली केली जात आहे. काही बँकानी एटीएम सेवा परवडत नसल्याचे सांगत किराया आणि सुरक्षा रक्षकाचा खर्च देणे सुध्दा निघत नसल्याचे सांगितले.

एटीएमची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे
अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील पंधरा दिवसात एटीएमफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात नागपूर येथील एक एटीएम मशीनच चक्क चोरट्यांनी पळवून नेली. तर वर्धा,भंडारा जिल्ह्यात सुध्दा एटीएममध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. गोंदिया जिल्ह्यात १७० एटीएम असून यापैकी बोटावर मोजण्याऐवढे एटीएम वगळता अनेक एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केलेली नाही. बहुतेक एटीएम हे काही कंपन्याना आऊटसोर्सिंग तत्वावर चालविण्यास देण्यात आले आहे. मात्र सदर कंपन्यांनी सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने अनेक गोंदिया शहर व जिल्ह्यातील एटीएम केंद्राची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे चित्र आहे.
मागीलवर्षी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडल्याची घटना होती. तर आंध्रप्रदेशातील एका एटीएममध्ये एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने सर्व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश बँका व्यवस्थापनाला दिले होते. मात्र न्यायालयाच्या या आदेशाची बँका आणि कंपन्याकडून सर्रासपणे पायमल्ली केली जात आहे. काही बँकानी एटीएम सेवा परवडत नसल्याचे सांगत किराया आणि सुरक्षा रक्षकाचा खर्च देणे सुध्दा निघत नसल्याचे सांगितले. तर काही बँकानी एटीएम केंद्रामध्ये सुरक्षा रक्षकाला पर्याय म्हणून सीसीटीव्हीचा वॉच ठेवला आहे. मिनी मुंबई अशी गोंदिया शहराची ओळख असून येथे मोठी बाजारपेठ आहे. शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे ७० वर एटीएम आहेत. ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा दिली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील एकूण एटीएमची संख्या १७० वर आहेत. कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कित्येकदा बँकेतून पैसे काढल्यानंतर बॅग हिसकावून नेणे, यासारख्या घटना घडल्या आहेत. अशात एटीएममधून पैसा काढण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक ठरत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी आपला मोर्चा एटीएम केंद्राकडे वळविल्याचे उघडकीस आली आहे. नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर एटीएम फोडणे शक्य न झाल्याने चोरट्यांनी चक्क एटीएम मशिनच चोरून नेल्याची घटना नागपूर येथे घडली. या घटनांमुळे पुन्हा एकदा एटीएम सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. लोकमतने याच पार्श्वभूमीवर शहरातील काही एटीएम केंद्राना सोमवारी (दि.१३) भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तेव्हा बहुतेक एटीएमध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे आढळले. शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम केवळ सीसीटिव्हीच्या निगरानीत असल्याची बाब पुढे आली. बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, एक्सीस बँक, इलाहाबाद बँक, या प्रमुख बँकाच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नसल्याचे आढळले आहे. दिवसा आणि रात्री सुध्दा येथे सुरक्षा रक्षक राहत नसल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. त्यामुळे एटीएम केंद्राची सुरक्षा रामभरोसे असल्याची बाब उघडकीस आली. बँकेच्या व्यवस्थापकांशी सुरक्षेबाबत विचारणा केली असता त्यांनी सीसीटिव्ही लावले असल्याचे सांगत यावर अधिक बोलणे टाळले. एटीएम केंद्रामध्ये चोरीच्या घटनां वाढत असता आणि न्यायालयाने एटीएम केंद्रामध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले असतांना त्याची सुध्दा बँकाकडून सर्रासपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र आहे. आयडीबीआय बँकेच्या जिल्ह्यात चार शाखा असून त्यांचे पाच ठिकाणी एटीएम आहेत. यात शहरातील बँक कार्यालयात दोन एटीएम असून अन्य तीन अन्य शहरांत आहेत. आयडीबीआय बॅॅँकेच्या सर्वच एटीएमच्या सुरक्षेसाठी गार्डची व्यवस्था असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले. आमच्या बँकेचा नियमच असून सर्वच एटीएमला गार्ड असल्याचेही त्यांनी सांगीतले.
एक्सीस बँकेच्या एटीएमवर सीसीटीव्हीचा वॉच
एक्सीस बँकेचे शहरात सर्वाधीक १० एटीएम आहे. या एटीएमच्या सुरक्षेसाठी गार्ड नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने एटीएम सीसीटिव्हीच्या निगरानीत असतानाच मशीन जमिनीत गाडलेली असल्याचेही सांगीतले.
ऑनलाईन व्यवहाराचा फटका
अलीकडे आईलाईन व्यवहारासाठी अनेक अॅप तयार झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी एटीएम केंद्रात जाण्याची गरज पडत नाही. परिणामी अनेक बँकाच्या एटीएमचे ट्रॉजेक्शन कमी झाले आहे. त्यामुळे जेवढा खर्च महिन्याकाठी एटीएम केंद्राचा येतो तो सुध्दा भरुन निघत नसल्याने बँकांना त्याचा आर्थिक फटका बसत असल्याचे बँकेच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
सुरक्षा रक्षकांचा रोजगार हिरावला
एकट्या गोंदिया जिल्ह्यात १७० एटीएम आहेत.प्रत्येक एटीएममध्ये एक सुरक्षा रक्षक नियुक्त केल्यास किमान १७० सुरक्षा रक्षकांना रोजगार मिळाला असता. पूर्वी बँकानी सर्वच एटीएममध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र बहुतेक एटीएम आता आऊटसोर्सिंगवर दिल्याने आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती न केल्याने सुरक्षा रक्षकांचा रोजगार सुध्दा हिरावला आहे.
रिर्झव्ह बँकेच्या धोरणाचा परिणाम
रिर्झव्ह बँकेने विविध बँकांसाठी काही नियम लागू केले आहे. त्यानुसार ज्या बँकेचे एटीएम आहेत. त्या बँकेतून महिन्यातूच चार ते पाच वेळा ट्रॉजेक्शन करता येते. तर ज्या बँकेचे एटीएम आहे त्या बँकेच्या एटीएममधून पैसे न काढता दुसऱ्या बँकेतून पैसे काढल्यास त्याचे चार्जेस लागतात. त्यामुळे या नियमाचा सुध्दा अनेक बँकेच्या एटीएम ट्रॉजेक्शनवर परिणाम झाला आहे.