शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी सहायता निधी
By Admin | Updated: October 24, 2016 00:52 IST2016-10-24T00:52:31+5:302016-10-24T00:52:31+5:30
जम्मू कश्मीरच्या उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जवानांच्या बेस कॅम्पवर हल्ला करुन १८ जवानांना शहीद केले.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी सहायता निधी
अभिनव उपक्रम : नवयुवक किसान गणेश उत्सव मंडळ
देवरी : जम्मू कश्मीरच्या उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जवानांच्या बेस कॅम्पवर हल्ला करुन १८ जवानांना शहीद केले. यात महाराष्ट्रातील तीन जवानांना शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना या परिस्थितीत आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीकोनातून देवरी येथील नवयुवक किसान गणेश उत्सव मंडळाने संपूर्ण शहर भ्रमण करुन शहिदांच्या नावे सहायता निधी गोळा केली. ही निधी महाराष्ट्राच्या त्या तीन शहिदांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्याकरिता या मंडळाची एक चमू येत्या २ नोव्हेंबर २०१६ रोजी देवरीवरुन निघणार आहे.
शहिदांमध्ये महाराष्ट्रातील सातारा येथील लान्स नायक शंकर व अमरावती येथील शिपाई उईके जनराव आणि नाशिक येथील शिपाही टी. सोमनाथ यांचा समावेश आहे. या शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीकोनातून देवरी येथील नवयुवक किसान गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.
यात अध्यक्ष दिनेश भेलावे, उपाध्यक्ष बाला निर्वाण, सचिव कैलास सोनवाने, सहसचिव भूपेश फुलसुंगे आणि सदस्य फत्तु श्रीभाद्रे, निखील शर्मा, निखील आगासे, सुनील भांडादे व निकेश बडगये यांनी पुढाकार घेवून संपूर्ण देवरी शहर भ्रमण जवळपास ४५ हजार रुपये सहायता निधी लोकांकडून गोळा करण्याचा संकल्प घेतला आहे. हा निधी समान रुपात म्हणजे १५ हजारप्रमाणे महाराष्ट्रातील तीन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्याकरिता येत्या २ नोव्हेंबर २०१६ रोजी या गणेश उत्सव मंडळाची चमू देवरीवरुन जवानांच्या कुटुंबीय असलेल्या शहराकडे निघणार आहेत. (प्रतिनिधी)