औद्योगिक ऑक्सिजन सिलिंडर त्वरित जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST2021-04-24T04:29:34+5:302021-04-24T04:29:34+5:30
गोंदिया : जिल्ह्यात सर्वत्र कोविड आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णवाढीचा दर लक्षात ...

औद्योगिक ऑक्सिजन सिलिंडर त्वरित जमा करा
गोंदिया : जिल्ह्यात सर्वत्र कोविड आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
रुग्णवाढीचा दर लक्षात घेता कोविड रुग्णांच्या उपचारादरम्यान मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने रुग्णांची वाढती संख्या बघता, उपचारादरम्यान वापर होणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनसाठी सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. औद्योगिक वापरासाठी असलेले सिलिंडर तहसील कार्यालयाकडे शनिवारी (दि. २४) सायंकाळी तहसील कार्यालयाकडे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी काढले आहेत.
वेल्डिंग युनिट व इतर आवश्ययक उद्योगाच्या वापरात नसलेले, सर्व औद्योगिक ऑक्सिजन सिलिंडर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात वापरासाठी याद्वारे तरतुदीनुसार अधिग्रहित करण्यात येत आहेत. व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र गोंदिया यांनी याबाबत सर्व आस्थापना, उद्योग, व्यक्ती यांना अवगत करावे व जम्बो ऑक्सिजन सिलिंडर गोंदिया तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी गोंदिया यांच्याकडे व इतर तालुक्यासाठी संबंधित तहसीलदार यांच्याकडे २४ एप्रिलला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावे. उपविभागीय अधिकारी गोंदिया व संबंधित तहसीलदार यांनी जमा करणाऱ्या आस्थापना, उद्योग, व्यक्ती यांचे नाव अथवा कोड सिलिंडरवर अंकित करावा. सर्व तहसीलदार यांनी त्यांच्याकडे जमा झालेले सिलिंडर उपविभागीय अधिकारी गोंदिया यांच्याकडे तत्काळ जमा करावे. सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून गोंदिया शहरालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बफर स्टॉक म्हणून आपत्कालीन स्थितीकरिता संग्रहित ठेवावे. हा बफर स्टॉक १०० सिलिंडरचा राहील. अधिग्रहित सिलिंडर पुरेसे उपलब्ध न झाल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करण्यात यावा. या संपूर्ण प्रक्रियेवर उपविभागीय अधिकारी गोंदिया यांचे नियंत्रण राहील. या आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी कळविले आहे.