युरियाच्या कृत्रिम तुटवड्याने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: September 18, 2014 23:37 IST2014-09-18T23:37:54+5:302014-09-18T23:37:54+5:30
खरीप हंगामातील धानपिकाला सध्यस्थितीत रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यातही धानावरील विविध रोगांवर आळा घालण्यासाठी व धानवाढीसाठी लाभ मिळत असल्याने युरियाची मागणी अधिक आहे.

युरियाच्या कृत्रिम तुटवड्याने शेतकरी त्रस्त
गोंदिया : खरीप हंगामातील धानपिकाला सध्यस्थितीत रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यातही धानावरील विविध रोगांवर आळा घालण्यासाठी व धानवाढीसाठी लाभ मिळत असल्याने युरियाची मागणी अधिक आहे. असे असतानाही मात्र युरियाचा तुटवडा दाखवून विक्रेते चढ्या दराने युरियाची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. यातून शेतकऱ्यांची चांगलीच लूट होत असल्याने शेतकरी कचाट्यात आला आहे. कृषी विभाग मोठ्या प्रमाणात युरिया उपलब्ध असल्याचे सांगत असताना मात्र होत असलेली ही टंचाई डोक्यावरून जात आहे.
खरीपात शेतकऱ्यांना रासायनिक खतांची अडचण भासू नये, म्हणून कृषी विभागाने युरिया खतांसाठी ३०,२०० मेट्रिक टन, डीएपी १,७०० मेट्रिक टन, एमओपी ३०० मेट्रिक टन, एसएसपी ६,९०० मेट्रिक टन व संयुक्त मिश्रखते मंजूर करण्यात आली. यापैकी युरियाचा २०,६५१.६ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला. डीएपीच्या २,१७०.२ व मिश्रखतांचा मिळून एकूण ५५ हजार ९७९.२५ मेट्रिक टन साठा जिल्ह्याला प्राप्त झाला. यापैकी ४९,१४१.३ मेट्रिक टन रासायनिक खत विक्री झाले. उपलब्ध साठ्यापैकी ६ हजार ८३७.९५ मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा अजुनही उपलब्ध आहे. यात २०० मेट्रिक टन युरिया आहे. युरियाचा साठा उपलब्ध असूनही कृत्रिम तुटवडा जिल्ह्यात झाला असल्याने मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील एकाही कृषी केंद्रावर युरिया दिसेनासा झाला आहे. सद्यस्थितीत २८५ रुपयांची खताची बॅग ५०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. रासायनिक खत व किटकनाशक औषधी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
लागवडीच्या महिनाभरानंतर प्रत्येक खरीप हंगामात युरिया खताचा तुटवडा दिसून येतो. कृषी विभाग प्रत्येक हंगामात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा तुटवडा होत नसल्याचे कागदोपत्री सांगत असले, तरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच युरिया खताचे भाव अचानक गगनाला भिडल्याने हा कृत्रिम तुटवडा कसा होत आहे हे कळायला मात्र मार्ग नाही.