गोंदिया : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावी. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या घटकांना लाभ देण्याचे काम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने करावे. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हा पालक सचिव श्याम तागडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, उपवनसंरक्षक कुलराज सिंग, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तागडे म्हणाले, शासनाच्या महत्त्वाच्या योजना जिल्हास्तरावर संबंधित विभागांकडून नियोजित पध्दतीने राबविणे गरजेचे आहे. प्रशासन आणि लाभार्थ्यांमध्ये समन्वय असणेदेखील गरजेचे आहे. कोणत्याही योजना राबविताना प्रशासन तसेच नागरिकांच्या समस्या शासन स्तरावर पोहचवून त्याचे निदान व पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आढावा बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील कोविड-१९ व बर्ड फ्लूसंदर्भात माहिती देण्यात आली. यानंतर या आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे सादरीकरण करण्यात आले. कृषी विभागातील पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता विशेष लक्ष देऊन पीक विमा योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळेल, असे निर्देश पालक सचिवांनी दिले. बैठकीत धान खरेदी, शिक्षण, पंचायत, बांधकाम विभाग, नगरपालिका प्रशासन, सहकार विभाग, सिंचन विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, महाआवास योजना इत्यादी विषयांवर आढावा घेऊन सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले.
....
गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवा
जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेचे जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सद्यस्थितीत एकूण १,०७,१६२ लाभार्थी आहेत. या योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य संबंधित विभागाने प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले.
....