एओपीतील प्रशिक्षण; १२१ मुले नोकरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:02 IST2017-08-26T22:02:31+5:302017-08-26T22:02:46+5:30
शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहणारे आदिवासी नक्षलवाद्यांना जेऊ घालत होते. मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना पोलीस विभागाव्यतिरिक्त शासनाचा कोणताही विभाग प्रवृत्त करीत नव्हता.

एओपीतील प्रशिक्षण; १२१ मुले नोकरीत
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहणारे आदिवासी नक्षलवाद्यांना जेऊ घालत होते. मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना पोलीस विभागाव्यतिरिक्त शासनाचा कोणताही विभाग प्रवृत्त करीत नव्हता. त्यामुळे नक्षलवाद्यांना आदिवासींनी जेवण देणे ही बाब त्यांची नित्याचीच होती. गोंदिया पोलिसांनी या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत त्यांच्या मुलांना शासकीय नोकरीत येण्याची संधी प्राप्त करुन दिली. गोंदिया जिल्हा पोलिसांच्या प्रेरणेने सात वर्षात आदिवासींचे १२१ मुले-मुली शासकीय नोकरीत लागले आहेत.
गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. ज्या गावात शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. रोजगाराचे साधन उपलब्ध नाही, शेतीवरच अवलंबून असलेल्या आदिवासींना जंगलातून मिळणाºया उत्पन्नावरच अवलंबून रहावे लागत असे. आयुष्य दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींना आयुष्य संपूनही कसलाही आधार मिळत नव्हता. त्यामुळे आदिवासी पोलिसांना मदत न करता नक्षलवाद्यांना जेवण देत होते. परंतु स्व.आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमुळे आदिवासींचे मन पोलिसांसोबत जुळविण्यास सुरूवात झाली. पोलीस व आदिवासी जनता यांच्यात समन्वय साधणारा दुवा म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने काम केले. या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. आदिवासी व नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असलेल्या गावांमध्ये पोलीस जाऊ लागले. पोलिसांनी आदिवासींचे दु:ख जाणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आधार कार्ड बनवून देणे, रेशन कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. पोलीस इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी आदिवासींच्या मुलांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांच्यासाठी भरती पूर्व पोलीस प्रशिक्षण सुरु केले. सन २०१० पासून आतापर्यंत २०६५ आदिवासी मुला-मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात आले. यात १२१ मुला-मुलींना पोलीस, सैन्य व होमगार्ड या ठिकणी नोकरी मिळविता आली.
शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत आदिवासी मुले-मुली कुठेही मागे पडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी जातीने लक्ष घालून लाखो रुपयांची पुस्तके खरेदी करुन एओपीमध्ये ठेवली आहेत. त्याचा लाभ आदिवासी परिसरातील तरुण-तरुणी घेत आहेत.
केशोरी पोलिसांनी प्रशिक्षण वर्ग घेतल्याने ४ जणांना नोकरी मिळाली. चिचगड पोलिसांनी २०१० मध्ये ४९ जणांना, २०१४ मध्ये १०२ जणांना, २०१५ मध्ये ८ जणांना प्रशिक्षण दिले. त्यातील ११ जण नोकरीला लागले. डुग्गीपार पोलिसांनी २०१५ मध्ये ५० जणांना प्रशिक्षण दिले. त्यातील १२ जण होमगार्ड मध्ये लागले. गोंदिया पोलिसांच्या मेहनतीमुळे आदिवासी मुले नोकरीसाठी प्रयत्न करू लागले. पोलिस विभागाने सुरू केलेल्या या भरती पूर्व प्रक्षिणाचा पुरेपूर फायदा आदिवासींनी घेतला.
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांना एकत्रित करुन त्यांच्या सभा घेतल्या. या तरुणांना स्पर्धेच्या युगात टिकता यावे यासाठी लाखो रुपयाची पुस्तके पुणे येथून खरेदी करुन एओपीमध्ये ठेवले आहेत. त्याचा लाभ पोलीस पूर्व भरती प्रशिक्षणासाठी तयारी करणारे मुले घेत आहेत.
-डॉ.दिलीप पाटील भुजबळ
पोलीस अधीक्षक, गोंदिया