गोंदिया : शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली गेल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आदेश असतानाही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर ३२ प्रकारची अशैक्षणिक कामे लादली गेली आहेत. मतदार यादी दुरुस्त करणे, फोटोपास वितरण, विविध प्रकारची सर्वेक्षणे, तहसील कार्यालयाकडून केबल सर्वेक्षण, सरकारी योजनांचा प्रचार, शाळाबाह्य मुलांची यादी तयार करणे, वर्गखोल्यांच्या बांधकामाचा जमाखर्च ठेवणे, कुटुंब सर्वेक्षण शालेय पोषण आहारांतर्गत आहार शिजविणे, शौचालय नोंदणी करणे, अशी विविध प्रकारची ३२ कामे शिक्षकांना करावी लागतात. खाजगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरे काम नाही. परंतु, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कामासह अशा विविध प्रकारची ३२ कामे त्यांच्या खांद्यावर आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे तशा पद्धतीने शिकविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेळच मिळत नाही. त्यामुळे अनेक पालकांचा कल खाजगी शाळांकडे असतो. शिक्षकांवर लादली गेलेली अशैक्षणिक ३२ कामे कमी केल्यास जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस आणखी मदत होईल, हे नाकारता येत नाही.
गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०३९ शाळा असून त्यात ३ हजार ५०० शिक्षक कार्यरत आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेच्या या शाळांमध्ये १ लाख १७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबर इतरही कामे शिक्षकांना करावी लागतात, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या गुणवत्तेवर निश्चितच परिणाम होतो.
....कोट
सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर शिक्षणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामाचे ओझे नाही. निवडणुकीचे काम हे शिक्षकांनाच नव्हे तर सर्वच कर्मचाऱ्यांना करावे लागते. त्यामुळे आता शैक्षणिक कामाचे ओझे शिक्षकांवर नाही.
- राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प., गोंदिया
.......... कोट
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांवर जेवढी मेहनत करायची आहे, तेवढी मेहनत करण्यासाठी ही ३२ प्रकारची कामे अडचण ठरतात. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबर विविध प्रकारची ३२ कामे करावी लागत असल्यामुळे या कामांच्या दडपणाखाली शिक्षक दबून जातो. शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढण्यात यावी.
प्रकाश ब्राह्मणकर, विभागीय अध्यक्ष शिक्षक भारती
.....
जिल्ह्यात एकच शिक्षक असलेली एकही शाळा नाही.
शिक्षकांना शिक्षणाबरोबर ३२ प्रकारची कामे करावी लागतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रकारे विद्यार्थ्यांकडे शिक्षकांना लक्ष द्यायला वेळच नसतो. आजघडीला एकाच शिक्षकावर शाळा आहे, असे चित्र गोंदिया जिल्ह्यात नाही, असे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी सांगितले. त्यामुळे एक शिक्षक दुसरी कामे सांभाळत असला तर एक शिक्षक किंवा उर्वरित शिक्षक शाळा सांभाळत असतात.
..............
जिल्ह्यातील जि.प. शाळा-१०३९
शिक्षकसंख्या- ३५०० विद्यार्थीसंख्या - ११७००० .....