आठ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: February 12, 2015 01:19 IST2015-02-12T01:19:33+5:302015-02-12T01:19:33+5:30
३१ आॅक्टोबर २०१४ पुर्वी संचालक मंडळांचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांची निवडणूक घेतली जाणार असून ...

आठ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
गोंदिया : ३१ आॅक्टोबर २०१४ पुर्वी संचालक मंडळांचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांची निवडणूक घेतली जाणार असून या आठही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सभासदांत मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे मात्र थकबाकीदारांचे निवडणूक लढण्याचे व मतदानाचे अधिकार हिरावणार असल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणद्वारे ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यांची जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणुक राहणार आहे.
१९९७ च्या घटना दुरूस्तीनुसार आता सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार आता सहकारी संस्थांच्या निवडणुका प्राधीकरणच्या माध्यमातूनच घेतल्या जाणार असून जिल्ह्यातील त्यांची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
प्राधीकरणने यासाठी काही नियम तयार केले असून संस्थांची अ, ब, क व ड या चार प्रकारात विभागणी केली आहे.
जिल्हा उप निबंधक कार्यलयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणच्या आदेशानुसार ३१ आॅक्टोबर २०१४ पूर्वी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ निवडणुकीस पात्र ठरत असून त्यांच्या निवडणुका पहिल्या टप्यात घेण्यात येणार आहेत. त्यानुसार या आठही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)
थकबाकीदारांत धाकधूक
संस्थांच्या निवडणुकीला घेऊन आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. मात्र वरील संस्थांमधील ज्या सभासदांकडे संस्थेची थकबाकी असेल त्यांना निवडणुकीत उभे राहण्याचा तसेच मतदानाचाही अधिकारी राहणार नाही. ९७ व्या घटना दुरूस्तीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संस्थेची थकबाकी असलेल्या सभासदांना निवडणुक लढण्याची असल्यास किंवा मतदानाचा अधिकार कायम ठेवण्यासाठी संस्थेची थकबाकी भरावी लागणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांची धडकी वाढली आहे.
निवडणुकीस पात्र आठ संस्थांमधील गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी संस्था ही मोठी संस्था आहे. यात ११ फेब्रुवारी रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. २५ फेब्रुवारी पर्यंत त्यावर आक्षेप व हरकती सादर करावयाच्या आहेत. ३ मार्च रोजी आक्षेप व हरकतींवर सुनावनी देऊन निकाली काढणे तर १२ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच अन्य सात संस्था लहान संस्था असून त्यांत १० फेब्रुवारी रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणे, २४ फेब्रुवारी पर्यंत त्यावर आक्षेप व हरकती सादर करणे, २ मार्च रोजी आक्षेप व हरकतींवर सुनावनी देऊन निकाली काढणे तर ११ मार्च रोजी अंतिम मतदार तयार करणे असा कार्यक्रम आहे.