Announcement of plans but when is the benefit? | योजनांची घोषणा केली मात्र लाभ केव्हा?
योजनांची घोषणा केली मात्र लाभ केव्हा?

ठळक मुद्देशेतकऱ्यांची फरफट सुरूच : धान उत्पादकांना आशा

संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : शेतकरी मोठा असो की लहान, शेती कोरडवाहू असो की ओलित,शेतात धान असो की भाजीपाला,आज पूर्व विदर्भातील एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. लहान शेतकऱ्याची जगण्याची तर मोठ्या शेतकऱ्याची मोठेपण टिकविण्याची धडपड सुरू आहे. लहान शेतकऱ्याची व्यथा लहान तर मोठ्या शेतकऱ्याची व्यथा मोठी आहे.मोठा शेतकरी उसणे अवसान आणून जगतो तर लहान शेतकरी आपल्या फाटलेल्या आयुष्याला ठिगळं लावण्याचा प्रयत्न करतो आहे.
शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहीलं आहे तेच कळत नाही. आता हेच बघा अर्जुनी मोरगावच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याना अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करण्याचे पत्र दिले.त्यांनी विश्वास ठेऊन शासकीय योजनेतून ट्रॅक्टर खरेदी केले. यासाठी पदरमोड करून व होते नव्हते असे करुन सावकारांकडून कर्ज घेतले.अनुदानाचे पैसे मिळाले की कर्जाची परतफेड करण्याची स्वप्न त्यांनी पाहिली होती. तशी कबुलीही धनकोंना दिली होती.मात्र ते आज गचाळ प्रशासनाचे बळी ठरून निरुत्तर झाले आहेत. निधी उपलब्ध नसतानाही अधिकच्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मंजूर करून खऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले.गेल्या पाच महिन्यापासून त्यांना अनुदानच मिळाले नाही.ते प्रशासकीय व्यवस्थेचे बळी ठरले आहेत.
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा कृषीपंप योजना आणली.२०१६ पासून अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही. शासनाने सौरऊर्जा कृषीपंप क्षेत्रात काम करणाऱ्या टाटा, सीआरआय, मुंदरा व रविंद्र एनर्जी या चार एजन्सीला काम दिले.ज्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे मागणी पत्राप्रमाणे पैशाचा भरणा केला त्यांना सौरऊर्जा कृषीपंप लाऊन देण्याची जबाबदारी या एजन्सीची आहे. शासन केवळ फर्मान सोडून निर्धास्त झाले पण शेतकऱ्यांच्या शेतात कृषीपंप पोहोचले किंवा नाही, काय अडचणी आहेत हे बघण्याचे साधे सौजन्य बाळगता आले नाही हे दुर्दैव आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात ४०८ शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मागील दोन वर्षांपासून पैसे भरूनही वीज जोडणी करण्यात आली नाही ही शोकांतिका आहे. आम्ही ५०० रु पये धान पिकाला बोनस दिले हे सांगण्याचा विसर मात्र राजकारण्यांना पडत नाही हे विशेष. शेतकरी सुखी व्हावा असं कुणालाच वाटत नाही.
शासन व प्रशासनात मोठमोठी जी माणसं बसली आहेत ती शेतकऱ्यांचीच पोरं असतांना हे घडते हीच खºया अर्थाने चिंतेची बाब आहे.आता रविवारचच बघा ना, खरीप हंगामाप्रमाणे उन्हाळी धानपिकाला ५०० रुपये बोनस देण्याची मागणी करण्यात आली. मात्र मुख्यमंत्री यासंदर्भात आपल्या भाषणात काहीच बोलले नाहीत.
त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. बुधवारी कॅबिनेट झाली त्यानंतरही असा निर्णय झाल्याचे ऐकिवात आले नाही. पालकमंत्री परिणय फुके हे सुध्दा खरीपाप्रमाणेच उन्हाळीला धान पिकाला बोनस मिळावे यासाठी अनुकुल आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून मोठ्या आशेने त्यांच्या नजरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री परिणय फुके यांच्याकडे लागल्या आहेत.

Web Title: Announcement of plans but when is the benefit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.