गणरचना व आरक्षणाचा नवीन कार्यक्रम जाहीर

By Admin | Updated: March 14, 2015 01:27 IST2015-03-14T01:27:47+5:302015-03-14T01:27:47+5:30

१२ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला.

Announcement of new program for publication and reservation | गणरचना व आरक्षणाचा नवीन कार्यक्रम जाहीर

गणरचना व आरक्षणाचा नवीन कार्यक्रम जाहीर

गोंदिया : १२ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या ग्रामीण क्षेत्रातील स्थितीत झालेला बदल लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गणरचना व आरक्षण सोडतीचा नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे. नवीन कार्यक्रमानुसार विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संख्या ५३ ठेवण्यात आली आहे. यात गोंदिया तालुक्यात पुन्हा एका जागेत वाढ झाली असून संख्या १४ तर गोरेगाव तालुक्यातील एक जागा कमी होऊन ही संख्या आता ५ झाली आहे. या नवीन कार्यक्रमामुळे मात्र इच्छूकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे या नवीन आरक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
राज्य शासनाच्या १२ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील सालेकसा, सडक अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, देवरी व आमगाव या तालुकास्थळ असलेल्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे. या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टिने या क्षेत्रातील स्थितीत बदल झाला आहे.
हा बदल लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भात जुना कार्यक्रम रद्द करुन नवीन कार्यक्रम ११ मार्च २०१५ रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने गोंदिया जिल्हा परिषदेकरिता सदस्य संख्या जुन्या कार्यक्रमानुसार ५३ ठेवली आहे. प्रभाग रचना तसेच आरक्षणानुसार जागा निश्चितीकरीता २००५ व २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी असलेले आरक्षण विचारात घेतले जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावांना विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित होणाऱ्या जागा तसेच महिलांसाठी राखीव जागांची सोडत काढण्यात येईल. जिल्हा परिषद निवडणुकीची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती निवडणुकीची सोडत तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना काढावयाची असून यावर उपजिल्हाधिकाऱ्यांची देखरेख राहील.
नवीन रचनेनुसार, गोंदिया तालुक्यात जिल्हा परिषदेची सदस्य संख्या १४, तिरोडा ७, गोरेगाव ५, आमगाव ६, सालेकसा ४, सडक अर्जुनी ५ अर्जुनी मोरगाव ७ व देवरी तालुक्यात ५ राहणार आहे. उल्लेखनीय म्हणजे यापुर्वी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या गणरचना व आरक्षण कार्यक्रमानुसार गोंदिया जिल्हा परिषद सदस्य संख्या ५२ वरुन ५३ झाली होती. तर आता नगर पंचायतीमुळे झालेल्या बदलामुळे व लोकसंख्येच्या घनतेमुळे गोंदिया तालुक्याला एक जागा जास्त मिळाली असून गोरेगाव तालुक्याला एक जागा गमवावी लागली आहे.या निवडणुक कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका वेळेनुसार होणार असून सर्वच पक्षाला उमेदवार निश्चिती व निवडणूक रणनीतीकरिता आता पुन्हा आरक्षणाची वाट पाहावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Announcement of new program for publication and reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.