अन् सहलीसाठी गेलेले विद्यार्थी सुखरूप परतले
By Admin | Updated: December 30, 2014 23:39 IST2014-12-30T23:39:11+5:302014-12-30T23:39:11+5:30
स्थानिक नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेले विद्यार्थी आग्रा स्थानकावर अडकून पडले. धुक्यामुळे गाडी रद्द झाल्याने त्यांची मोठी अडचण झाली.

अन् सहलीसाठी गेलेले विद्यार्थी सुखरूप परतले
केशोरी : स्थानिक नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेले विद्यार्थी आग्रा स्थानकावर अडकून पडले. धुक्यामुळे गाडी रद्द झाल्याने त्यांची मोठी अडचण झाली. अखेर खासदार नाना पटोले यांच्या प्रयत्नाने दुसऱ्या गाडीला अतिरीक्त डब्बा जोडून विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली.
नवोदय हायस्कूल तथा नवोदय कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल दिल्ली व आग्रा येथे नेण्यात आली होती. यामध्ये ८० विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि आठ शिक्षक होते. तीन दिवस दिल्ली येथील प्रेक्षणीय स्थळे पाहून झाल्यानंतर परतीच्या प्रवासात आग्रा येथील प्रेक्षणीय स्थळे पाहून आग्रा येथून सुटणाऱ्या गोंडवाना रेल्वे गाडीचे रिझर्व्हेशन करण्यात आले होते. रेल्वे स्टेशनवर येताच दाट धुक्यामुळे ऐनवेळी सदर गाडी रद्द करण्यात आल्याची सूचना मिळाल्याने सर्वजण घाबरले.
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने आग्रा येथून नागपूरकडे जाणाऱ्या दुसऱ्या गाडीचे रिझर्व्हेशन मिळावे म्हणून शिक्षकांनी तेथील रेल्वे प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन साकडे घातले परंतु तेथील कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्यांनी शिक्षकांची कैफीयत ऐकली नाही.
त्यामुळे एवढ्या विद्यार्थ्यांची जाण्याची व्यवस्था कशी करावी या विवंचनेत शिक्षक मंडळी घाबरली आणि त्यांनी खासदार पटोले यांना दूरध्वनीवरून घडलेला प्रकार सांगीतला.
यावर खासदार पटोले यांनी लगेच केंद्रीय रेल्वे मंत्री ना. सुरेश प्रभू यांना आग्रा रेल्वे स्टेशनवरून नागपूरकडे जाणाऱ्या गाडीला नवीन बोगी लावून विद्यार्थ्याची गैरसोय टाळण्याची विनंती केली. लगेच केंद्रीय रेल्वे मंत्री प्रभू यांनी कसलाही विलंब न लावता तेथील रेल्वे अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून आदेश दिले.
त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत रेल्वे अधिकाऱ्यांनी अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांची नागपूरपर्यंत जाणाऱ्या गाडीला दुसरी बोगी लावून पोहचविण्याची व्यवस्था केली. त्याबद्दल प्रकाश पाटील गहाणे, नंदू पाटील गहाणे तसेच विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची खा. नाना पटोले यांचे आभार व्यक्त केले. (वार्ताहर)