पालिकेत रंगणार सत्तेचा सारीपाट

By Admin | Updated: July 19, 2014 01:23 IST2014-07-19T01:23:51+5:302014-07-19T01:23:51+5:30

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या गोंदिया नगर पालिकेच्या

The allotment of power will be played in the party | पालिकेत रंगणार सत्तेचा सारीपाट

पालिकेत रंगणार सत्तेचा सारीपाट

- तर नगराध्यक्षपद भाजपकडे : तीन नगरसेवकांच्या अपात्रतेमुळे सत्ताधारी अल्पमतात
मनोज ताजने  गोंदिया

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या गोंदिया नगर पालिकेच्या निवडणुकीत दोन अपक्षांच्या मदतीने सत्तेत जाऊन बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आता पुन्हा अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ येत्या ६ आॅगस्टला संपणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात नगराध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी नव्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे तीन नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे सत्ताधारी दोन्ही काँग्रेस अल्पमतात आहे. त्यामुळे हा सत्तेचा सारीपाट चांगलाच रंगणार आहे.
गोंदिया नगर पालिकेच्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाने प्रथमच सर्वाधिक १६ जागा पटकावल्या. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने ११, काँग्रेसने ८, शिवसेनेने ३ तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी पटकावल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेचे संख्याबल १९-१९ असे समान झाले होते. परंतू दोन्ही अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे ओढण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आणि १९ विरूद्ध २१ अशी आघाडी घेत दोन्ही काँग्रेसने सत्ता काबीज केली.
दरम्यान काँग्रेसच्या ५ नगरसेवकांनी नगराध्यक्षपदासह सभापतीपद मिळण्यासाठी गोंदिया लोकतांत्रिक काँग्रेस नावाने स्वतंत्र दबावगट स्थापन करून तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला. परंतू हातून सत्ता जाऊ नये यासाठी त्या गटाला सोबत घेऊन दोन्ही काँग्रेसने भाजप-सेनेला विरोधी बाकांवर बसण्यास भाग पाडले होते. परंतू पक्षाशी गद्दारी करणाऱ्या त्या नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक राकेश ठाकूर यांनी त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. काही दिवसानंतर ते नगरसेवक पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. परंतू अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात न.प.चे माजी उपाध्यक्ष भगतराम ठकरानी, ममता बन्सोड आणि निर्मला मिश्रा यांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र घोषित केले.
आता नगर पालिकेतील काँग्रेसचे संख्याबळ ८ वरून ५ वर आले आहे. त्यामुळे दोन अपक्षांना सोबत घेतले तरी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे संख्याबळ १८ तर भाजप-सेनेचे संख्याबळ १९ होत आहे. त्यामुळे भाजप-सेनेची सत्ता नगर पालिकेत येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मात्र तोंडावर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक लक्षात घेता काँग्रेसला नगर पालिकेत सत्ता ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकीय गेम करून केवळ एक नगरसेवक आपल्या बाजुने वळविला तरी पुन्हा काँग्रेस-राकाँची सत्ता नगर पालिकेत येणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोर लावल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र भाजप-सेनेतील कोणीही नगरसेवक काँग्रेसच्या गोटात जाणार नाही, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे गोंदिया नगर पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्वीप्रमाणे स्वारस्य राहिले नसल्यामुळे काँग्रेसला जड जाऊशकते.
येत्या ६ आॅगस्टला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वीच ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक कोणत्या तारखेला घ्यायची याबाबतचा निर्णय अजून घेतलेला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
न.प.च्या इतिहासात प्रथमच येणार भाजप सत्तेत
४सत्ताबदल होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत असल्यामुळे भाजपात सध्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या १६ नगरसेवकांपैकी ८ महिला आहेत. त्यामुळे एखाद्या महिलेला नगराध्यक्षपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजप-सेना सत्तेत बसल्यास गोंदिया नगर पालिकेच्या इतिहासात भाजपचा नगराध्यक्ष पदारूढ होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

 

Web Title: The allotment of power will be played in the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.