वनसमितीच्या वतीने गॅस कनेक्शनचे वाटप
By Admin | Updated: May 7, 2016 01:49 IST2016-05-07T01:49:21+5:302016-05-07T01:49:21+5:30
वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत ताडगाव येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना ८२ एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.

वनसमितीच्या वतीने गॅस कनेक्शनचे वाटप
बोंडगावदेवी : वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत ताडगाव येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना ८२ एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.
ताडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा येथे आयोजित गॅस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रापंचायत सरपंच रेखा मडावी होते. याप्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी सी.जे. रहांगडाले, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चोपराम मेश्राम, सचिव डी.सी. बरडे, वनसमितीचे उपाध्यक्ष प्रविण सयाम प्रामुख्याने उपस्थित होते.
गॅस वितरण समारंभाला उपस्थित महिला-पुरुषांना मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले म्हणाले, गावाच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली आहे. वन समितीमध्ये संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग आहे. आपल्या गावातील जंगलाचे संगोपन करुन जंगल वाढीसाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, जंगलातील संपत्ती ही गावकऱ्यांची आहे. तिचे जतन करणे सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. जंगलापासून ग्रामस्थांचे स्वास्थ्य निरोगी राहून विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. जंगलतोड होऊ नये तसेच महिलांना धुरांपासून संरक्षण मिळावे यासाठी वन व्यवस्थापन समितीच्या वतीने एलपीजी गॅस कनेक्शन गावकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याचे आरएफओ रहांगडाले यांनी सांगितले.
गावाच्या विकासात हातभार लावण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.या वेळी गावातील ८२ गरजू लाभार्थ्यांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. वन रक्षक डी.सी. बरडे यांनी संचालन करुन आभार मानले. या वेळी लाभार्थ्यांसह वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच इंडेन गॅस अर्जुनी मोरगावचे वितरक प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)