दारूच्या नशेतच झाला अनिलचा घात

By Admin | Updated: March 13, 2015 01:56 IST2015-03-13T01:56:05+5:302015-03-13T01:56:05+5:30

वर्षभरापूर्वीच त्याचा पत्नीशी काडीमोड झाला होता. मुलबाळही नव्हते. कदाचित याच वैफल्यातून तो दारूच्या आहारी गेला.

Alcohol drunken Anil's assault | दारूच्या नशेतच झाला अनिलचा घात

दारूच्या नशेतच झाला अनिलचा घात

मनोज ताजने गोंदिया
वर्षभरापूर्वीच त्याचा पत्नीशी काडीमोड झाला होता. मुलबाळही नव्हते. कदाचित याच वैफल्यातून तो दारूच्या आहारी गेला. मंगेझरीत टेलर म्हणून वावरत असताना सर्वांशीच त्याचे चांगले संबंध होते. मात्र तो जादूटोणा करीत असल्याचा संशय घेऊन त्याची गावकऱ्यांनी हत्या केल्यानंतरही अनिलबद्दल गावात फारशी हळहळ का व्यक्त होत नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. वरकरणी पाहता अनिलचे दारूच्या आहारी जाण्यामुळेच तो सख्ख्या बहिणीपासून आणि जावयापासून दुरावल्या गेला असल्याचे दिसून येते. यामुळेच अनिलच्या चितेची राख सावडण्यासाठीही कोणी समोर आलेले नाही.

धुळवडीच्या दिवशी (दि.६) नागझिरा अभयारण्याच्या तोंडाशी असलेल्या मंगेझरी या गावात अनिल हळदे या ४५ वर्षीय इसमाची गावातील लोकांनी बेदम मारहाण करून हत्या केली. अनिल गावात जादूटोणा करीत असल्याचा संशय गावकऱ्यांना असल्यामुळे त्याला संपविल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यामागे अजूनही काही कारणे आहेत का याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे.
अनिल हा वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या तळेगाव (श्यामजीपंत) येथील रहिवासी होता. १५ वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले. पण त्याला मुलबाळ काहीच नव्हते. गावात तो टेलरिंगचे काम करून जेमतेम कमवित होता. घरी वृद्ध आणि पत्नी असे त्याचे छोटे कुटुंब होते. मात्र दारूचे व्यसन जडल्यामुळे त्याचे पत्नीसोबतही पटत नव्हते. यातूनच एक वर्षापूर्वी त्याचा पत्नीशी काडीमोड झाला. आपला भाऊ सुधारला पाहीजे म्हणून मंगेझरी येथील इंदिरा पांझारे यांनी त्याला आपल्या गावात येऊन टेलरिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. गावात चिकन भोजनालय चालविणारे बहिण इंदिरा व जावई रतीराम पंधरे यांनी काही अंतरावर असलेल्या आपल्या जुन्या घरात अनिलची राहण्याची व्यवस्था केली. त्याच घरातील समोरच्या खोलीत त्याने टेलरिंगचे दुकान थाटले. त्याच्या दारूड्या स्वभावामुळे जावयांनी त्याला स्वत:च्या हाताने स्वयंपाक करून खाण्याचा सल्ला दिला होता.
ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मृत अनिलची राख अजूनही तिथेच पडून आहे. त्यातील काही अस्थी पोलिसांनी जप्त करून रासायनिक परीक्षणासाठी पाठविल्या आहेत. पण उर्वरित राख सावडून तिचे विधीवत विसर्जन करण्यासाठीही कोणी नातेवाईक पुढे आलेले नाही, ही बाब बरेच काही सांगून जाते.
महिनाभरात शिजला कट?
अनिल टेलरिंगचे काम करीत असला तरी गेल्या ५ फेब्रुवारीला तो जावयांकडील ओळखीच्या लोकांसोबत भुसावळ येथे बांधकामाच्या कामावर गेला होता. ५ मार्चला तो तिरोड्यात आणि ६ ला धुळवडीच्या दिवशी मंगेझरीत पोहोचला. पण ज्या पद्धतीने त्याला सर्वांनी मिळून मारून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यावरून त्याला मारण्याचा कट तो गावात नसतानाच्या एक महिन्याच्या कालावधीतच शिजला असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तो गावात येण्याची वाट असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच दिवशी त्याला गाठले आणि दारूच्या नशेतच त्याला कायमचे संपविले.

Web Title: Alcohol drunken Anil's assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.