पुन्हा दोन कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:01:00+5:30
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.येथील प्रयोगशाळेत दररोज १२० स्वॅब नमुने तपासणीची सुविधा आहे.त्यामुळे ८ जूनपासून स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण देखील वाढविण्यात आले आहे.

पुन्हा दोन कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील पाच दिवसात नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नाही. तर सोमवारी (दि.२२) पुन्हा दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आता केवळ ३० अॅक्टीव्ह कोरोना बाधित असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.येथील प्रयोगशाळेत दररोज १२० स्वॅब नमुने तपासणीची सुविधा आहे.त्यामुळे ८ जूनपासून स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण देखील वाढविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण १९०८ जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १०२ नमुने कोरोना बाधित आढळले.तर १७१५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत एकूण ७२ रुग्ण कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.
तर ९१ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया प्रयोगशाळेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत ७२ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामुळे निश्चित ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यातील विविध शाळा आणि संस्थामधील क्वारंटाईन कक्षात ७९३ तर होम क्वारंटाईन १९३५ असे एकूण २७२८ जण क्वारंटाईन असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याला ब्रेक लागल्याने निश्चितच जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने सुध्दा यासाठी आता उपाययोजना सुरू केल्या आहेत.
आरोग्य सेतू अॅप आणि सर्वेक्षणाची मदत
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, त्याला वेळीच प्रतिबंध लागावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी आरोग्य विषयक सर्वेक्षण तसेच आरोग्य सेतू अॅपची मदत घेतली जात आहे.
विदेशातून येणाऱ्या थेट क्वारंटाईन
तिरोडा तालुक्यातील तीनशेवर नागरिक दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ते रोजगारासाठी गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतत आहे. मागील दहा ते बारा दिवसांच्या कालावधी जिल्ह्यात दीडशेवर नागरिक जिल्ह्यात परतले आहे. तर रविवारी (दि.२१) रात्री सुध्दा काही नागरिक दुबईहून परतले असून त्यांना थेट क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणी केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होत आहे.