Again six corona-infected corona-free | पुन्हा सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त

पुन्हा सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : चार दिवसात ४४ जण कोरोनामुक्त, आता २३ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र मागील ११ दिवसांच्या कालावधीत प्रथमच सोमवारी (दि.१) एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. तर सहा कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सोमवारचा दिवस जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरला. आत्तापर्यंत एकूण ४४ जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता २३ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३९ दिवस कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. मात्र १९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ६७ वर पोहचली. कोरोना बाधीतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आणि हे सर्व ग्रामीण भागातील असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई, पुणे आणि रेड झोन क्षेत्रातून आलेल्या नागरिकांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला. याला काही प्रमाणात प्रशासनाचा दुर्लक्षितपणा सुध्दा कारणीभूत ठरला. सुरूवातील दोन असणारी कोरोना बाधीतांची संख्या ३१ मे पर्यंत ६७ वर पोहचली. ही जरी चिंता वाढविणारी बाब असली तरी एकूण कोरोनाबाधीत रुग्णांपैकी ३८ जण रविवारपर्यंत कोरोनामुक्त झाले. तर सोमवारी पुन्हा सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४४ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ २३ अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधीत आहे. त्यामुळे निश्चितच ही बाब जिल्हावासीयांना थोडा दिलासा देणारी आहे.
कोरोना बाधीत रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेले सहाही जण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. यासर्वांवर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होता. कोरोना बाधीत रुग्ण होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडा कमी होत आहे. शिवाय जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.

११ दिवसात प्रथमच नवीन रुग्णाची नोंद नाही
जिल्ह्यात १९ मे पासून सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. त्यामुळे केवळ दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६७ वर पोहचला होता. मात्र सोमवारी जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी निश्चितच ही दिलासा देणारी बाब आहे.


प्रयोगशाळेत आजपासून स्वॅबचे ट्रायल सुरू
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. तसेच सर्व यंत्रसामुग्री सुध्दा आली असून मंगळवारपासून (दि.२) येथील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणीचे ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. एम्स व आयसीएमआरकडून परवानगी मिळताच गोंदिया येथेच स्वॅब नमुने तपासले जातील.

Web Title: Again six corona-infected corona-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.