पुन्हा संततधार
By Admin | Updated: August 4, 2014 23:48 IST2014-08-04T23:48:36+5:302014-08-04T23:48:36+5:30
रविवारपासून संततधार पाऊस बरसत असल्याने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. आठही तालुक्यांत या पावसाची नोंद केली जात असून देवरी व सडक अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

पुन्हा संततधार
वृद्ध वाहून गेला : धरणांची दारे उघडली, मार्ग बंद
गोंदिया : रविवारपासून संततधार पाऊस बरसत असल्याने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. आठही तालुक्यांत या पावसाची नोंद केली जात असून देवरी व सडक अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसात देवरी तालुक्यात एक वृद्ध वाहून गेला आहे. तर जिल्ह्यातील तीन प्रमुख प्रकल्पांचे गेट उघडण्यात आले आहेत. काही भागात घरांच्या पडझडीच्या घटनाही पुढे येत आहेत.
मागील महिन्यात बरसलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात चांगलाच कहर केला होता. प्राणीहानी सह मोठ्या प्रमाणात नुकसानी या पावसामुळे झाली होती. त्यानंतर काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर रविवारपासून (दि.३) संततधार पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात हा पाऊस बरसत असल्याची नोंद आहे.
गोंदिया- तालुक्यात रविवारपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे काही प्रमाणात जनजिवन विस्कळीत झाले असतानाच अन्य काही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सकाळ पर्यंत १४ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
तिरोडा- तालुक्यात रविवारच्या रात्रीपासून पाऊस बरसत असून सकाळ पर्यंत २८ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. या पावसामुळे काहीच परिणाम जाणवला नसून नुकसान झालेले नाही.
गोरेगाव- संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात सकाळपर्यंत १४.३ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून या संततधार पावसामुळे नदी नाल्यांची धोक्याची पातळी ओलांडली आहे. मात्र वृत्त लिहेपर्यंत नुकसानीची माहिती नव्हती.
देवरी- तालुक्याला रविवारपासून पावसाने चांगलेच झोडपून क ाढले असून सोमवारी सकाळ पर्यंत ८६ मिमी. पाऊस बरसला होता. यामुळे तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले असून बेलारगोंदी नाल्यात सोमवारी दुपारी १२.३० वाजता दरम्यान उदाराम शंकर चांदेवार (६०,रा.शेरपार) हे वाहून गेले. त्यांचा मृतदेह हाती लागला नसल्याने १५ पोलीस कर्मचारी व ३० सी-६० चे जवान शोधकार्यात लागले होते. चांदेवार देवरी येथून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असताना पुलावरून पाणी वाहात होते. त्यांना काही लोकांना रोखण्याचाही प्रयत्न केला होता.
आमगाव- तालुक्यात शनिवारच्या रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे जनजिवन प्रभावीत झाले नाही. शिवाय कुठल्याही प्रकारच्या नुकसानीची घटना घडलेली नाही.
सडक अर्जुनी- रविवारपासून पाऊस बरसत आहे. मात्र पावसाची रिपरिप सुरू असल्याने कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. तरिही तालुका प्रशासन नजर ठेऊन आहे. तालुक्यातील कोणताही रस्ता बंद झालेला नसल्याची माहिती आहे.
अर्जुनी मोरगाव- रविवारपासून पाऊस सुरू असला तरिही पावसाची रिपरिप असल्याने तालुक्यात काहीच नुकसान झालेले नाही. शिवाय अद्याप पंधरवड्यानंतर दमदार पाऊस आल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद दिसून येत आहे. तर इटियाडोह धरणातून एक हजार क्यूसेक्स पाण्याचा सिंचनासाठी विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सर्व रस्ते सुरळीत सुरू असून कुठल्याही नुकसानीची नोंद नाही. (प्रतिनिधींकडून)