कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:23+5:302021-01-13T05:15:23+5:30
गोंदिया : गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे जमीनदोस्त असलेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला होता. पक्षी आणि अंड्यांना चांगला ...

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धोका वाढला
गोंदिया : गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे जमीनदोस्त असलेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला होता. पक्षी आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघत असतानाच, आता बर्ड फ्लूने मोठे संकट उभे केले आहे. ग्राहक अप्प्रचाराला बळी पडत आहेत. बर्ड फ्लूच्या धास्तीने पोल्ट्री फार्म उद्योजक पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथे दोन दिवसांपूर्वी दोन कावळे मृतावस्थेत आढळले. त्या कावळ्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी दिली आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लू नाही कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाच तर त्याला निपटण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आरआरटी चमू तयार करण्यात आली आली. सूचना मिळताच ही चमू त्या ठिकाणी पाेहोचणार आहे. प्रत्येक तालुक्याचे अधिकारी कर्मचारी आपल्या तालुक्यातील पोल्ट्री फार्मला भेटी देऊन याची सतत पाहणी करत आहेत. पशुसंवर्धन विभाग बर्ड फ्लूला घेऊन सज्ज आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणांकडे बारीक नजर ठेवण्यात आली आहे.
मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा
आता बर्ड फ्लूचा धोका वाढू शकतो. कुठेही मृत पक्षी आढळल्यास त्वरित माहिती पशुसंवर्धन विभागाला द्यावी. सद्य:स्थितीत गोंदिया जिल्ह्यात पक्षी मृत पावल्याची एक घटनावगळता इतर घटना घडल्या नाहीत. जिल्ह्यात कुठेही पक्षी मृत आढळल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले.
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
प्रत्येक तालुक्यात आरआरटी चमू तयार करण्यात आली. या चमूच्या माध्यमातून आपापल्या तालुक्यातील पोल्ट्रीची तपासणी ही चमू करते.
पक्षी मृत असल्याची बातमी कळताच ही चमू पोहोचेल नमुना गोळा करून तपासणीसाठी भोपाळला पाठवेल.
या चमूतील कर्मचारी, अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे शिवाय बैठकही घेतली जात आहे.
बर्ड फ्लू गोंदिया जिल्ह्यात अजूनही आला नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. अंडी व मास खाणाऱ्यांना ते खाता येईल.
- डॉ. कांतीलाल पटले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी