सांकेतिक आंदोलनानंतर ‘एपीएमसी’चा व्यवहार पूर्ववत
By Admin | Updated: December 25, 2014 23:34 IST2014-12-25T23:34:27+5:302014-12-25T23:34:27+5:30
अडतच्या मुद्याला घेऊन व्यापाऱ्यांनी केलेल्या दोन दिवसीय सांकेतिक आंदोलनानंतर बुधवारपासून (दि.२४) येथील बाजार समितीतील खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याचे दिसून आले.

सांकेतिक आंदोलनानंतर ‘एपीएमसी’चा व्यवहार पूर्ववत
गोंदिया : अडतच्या मुद्याला घेऊन व्यापाऱ्यांनी केलेल्या दोन दिवसीय सांकेतिक आंदोलनानंतर बुधवारपासून (दि.२४) येथील बाजार समितीतील खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याचे दिसून आले. बाजार समितीकडून अडतच्या विषयावरील स्थगितीचे लेखी पत्र देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरू केल्याची माहिती आहे.
अडत शेतकऱ्यांकडून न घेता आता व्यापाऱ्यांकडून घेण्याचे आदेश पणन संचालकांनी काढले होते. त्यांच्या या आदेशाच्या विरोधात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सोमवारी (दि.२२) धान खरेदी बंद केली होती. तर या आदेशावर स्थगिती आल्यानंतरही व्यापाऱ्यांनी या आदेशावर स्थगिती न देता आदेश कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करीत मंगळवारी (दि.२३) सांकेतीक व्यवहार बंद ठेवले होते.
बाजार समितीत कार्यरत अडत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन दिवसांत बाजार समितीत सुमारे एक कोटींचे व्यवहार ठप्प पडले. दरम्यान व्यापाऱ्यांना अडतच्या आदेशावर आलेल्या स्थगितीचे लेखी पत्र देण्यात आल्यानंतर बुधवारपासून (दि.२४) व्यापाऱ्यांनी धान खरेदी पुन्हा सुरू केली.
धान खरेदी सुरू होताच बुधवारी सुमारे साडे चार हजार क्विंटल धानाची खरेदी झाल्याचीही माहिती आहे. एकंदर एपीएमसीचा व्यवहार पूर्ववत सुरू झाला आहे.
(शहर प्रतिनिधी)