हाजरा फॉल येथे आता ‘अॅडवेंचर स्पोर्टस्’
By Admin | Updated: January 3, 2015 23:04 IST2015-01-03T23:04:39+5:302015-01-03T23:04:39+5:30
निसर्गाचे वरदान म्हणून जिल्ह्यातच काय, लगतच्या राज्यांत ओळख असलेल्या हाजरा फॉल येथे आता पर्यटकांसाठी पर्यटनाशिवाय एक विशेष भेट वनविभागाकडून दिली जाणार आहे.

हाजरा फॉल येथे आता ‘अॅडवेंचर स्पोर्टस्’
वन विभागाचा पुढाकार
कपिल केकत - गोंदिया
निसर्गाचे वरदान म्हणून जिल्ह्यातच काय, लगतच्या राज्यांत ओळख असलेल्या हाजरा फॉल येथे आता पर्यटकांसाठी पर्यटनाशिवाय एक विशेष भेट वनविभागाकडून दिली जाणार आहे. वन विभागाने मांडलेल्या एडवेंचर स्पोर्टस्च्या (साहसी खेळ) प्रस्तावाला जिल्हा पर्यटन समितीने मंजूरी दिली असून हाजरा फॉल येथे येत्या दोन-तीन महिन्यांत ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अंदाज वन विभागाकडून वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकांच्या विकासासाठी, त्यांच्याच माध्यमातून हा प्रयोग राबविला जाणार असून यासाठी नवाटोला येथील १० जणांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आजघडीला जिल्हावासीयांना सुटीचा अवघा दिवस घालविण्यासाठी पाहिजे तसे पर्यटन स्थळ नाही. सालेकसा तालुकास्थळापासून सुमारे आठ कि.मी. अंतरावरावरील कोसमतर्रा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेले हाजरा फॉल हे पर्यटन स्थळ वनविभागाच्या अखत्यारित येते. हाजरा फॉल जरी पर्यटकांना आकर्षीत करीत असले तरी काही तासांच्या विरंगुळा केल्यानंतर दिवस घालविण्यासाठी दुसरे असे काहीच नाही. शिवाय हाजरा फॉलचे विशेष आकर्षण पावसाळ््यापुरते मर्यादीत न राहता वर्षभर पर्यटकांची आवाजावी रहावी यासाठी नवे काही करण्याच्या विचारात वन विभाग होता. यातूनच हाजरा फॉल येथे एडवेंचर स्पोर्टस सुरू करण्याची संकल्पना वन विभागाचे उप वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांना सुचली व त्यांनी एडवेंचर स्पोर्टस्चा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत असलेल्या जिल्हा पर्यटन समितीकडे मांडला. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमित सैनी यांनाही आवडला व त्यांनी लगेच मंजूरी दिली.
नॅशनल एडवेंचर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वन विभाग हा नावीन्यपूर्ण प्रयोग येथे करणार आहेत. यांतर्गत स्थानिक लोकांच्या सहभागातून पर्यटनस्थळाचा विकास व सोबतच त्या लोकांच्या हाताला काम मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी जवळील ग्राम नवाटोलावासीयांची वन व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली असून नवाटोलावासीयांचे सहकार्य लाभत आहे.
सर्व कारभार वन व्यवस्थापन समितीकडे
हाजरा फॉलकडे वन विभागाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळाचा विकास होऊ शकला नाही. विशेष म्हणजे वन विभाग याकडे सातत्याने लक्ष देऊ शकत नसल्याने स्थानिक लोकांच्या माध्यमातूनच याचा विकास साधण्यासाठी वन विभाग प्रयत्नरत आहे. यामुळे इको-डेव्हलपमेंट अंतर्गत नवाटोला येथे वन व्यवस्थापन समिती गठित करून त्यांच्या मार्फत सध्या या स्थळाची स्वच्छता, व्यवस्थापन व अनैतिक प्रकारांवर आळा घालण्याचे कार्य केले जात आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या ५ आॅक्टोबर २०११ च्या परित्रकानुसार वन व्यवस्थापन समितीला पर्यटकांकडून शुल्क आकारण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. पुढेही हाजरा फॉलच्या माध्यमातून येणारे उत्पन्न वन व्यवस्थापन समितीकडेच राहणार असून त्यातूनच समितीला या स्थळाचा विकास व देखरेख व अन्य खर्च वहन करायचे आहेत. तसेच येथील लोकांच्या हाताला यातूनच काम उपलब्ध होणार आहेत.