कुपोषणमुक्तीसाठी दत्तक-पालक योजना
By Admin | Updated: July 22, 2016 02:36 IST2016-07-22T02:36:06+5:302016-07-22T02:36:06+5:30
आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यात सरकारी यंत्रणेला फारसे यश आलेले नाही.

कुपोषणमुक्तीसाठी दत्तक-पालक योजना
जिल्हा प्रशासनाचा पुढाकार : सामाजिक संस्थांची घेणार मदत
नरेश रहिले गोंदिया
आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यात सरकारी यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. त्यामुळे कुपोषणमुक्तीसाठी आता जिल्हा प्रशासनाने नवीन फंडा आणला आहे. यात कुपोषित बालकांना सामाजिक संस्थांनी, नागरिकांनी दत्तक घ्यावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. त्यानुुसार गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेत दत्तक-पालक योजनेला मंजुरी दिली आहे. यात अदानी फाऊंडेशनने ४५ गावे दत्तक घेण्याची तयारी दर्शविली आहे.
गोंदिया जिल्ह्यात ८८ हजार ३९३ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४ हजार ८२४ बालके कमी वजनाची, ९४६ तीव्र कमी वजनाची तर ७३ बालके अतितीव्र कमी वजनाची आढळली आहेत. कुपोषणाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशन, तसेच सन २००४-१५ पासून माता आरोग्य व पोषण मिशन सुरू करण्यात आले. मात्र कुपोषणाला आळा घालण्यात पाहीजे त्या प्रमाणात यश आले नाही.
या मिशनअंतर्गत १४ जून २०१६ ला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दत्तक पालक योजना सुुरू करण्याची सूचना दिली. त्या आधारावर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी या अभियानाला मंजुरी दिली आहे. दत्तक पालक योजनेसोबत व्हीसीडीसीच्या माध्यमातून हे कुपोषणमुक्त अभियान राबविले जाणार आहे.
ही योजना अंमलात आणण्यासाठी सर्व पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुक्यातील नियंत्रण पथक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पत्र पाठविण्यात आले.
आरोग्य व बालकल्याण विभागासह शासकीय, अशासकीय संस्था, जेष्ठ नागरिक हे कुपोषणाच्या श्रेणीतील सॅम-मॅम बालकांना दत्तक घेतील.