उपोषणामुळे प्रशासन नरमले
By Admin | Updated: March 12, 2016 01:59 IST2016-03-12T01:59:36+5:302016-03-12T01:59:36+5:30
नवेगावबांध जलाशयाच्या पाणीचोरी प्रकरणी पाच गावांतील १३ शेतकऱ्यांनी ६ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

उपोषणामुळे प्रशासन नरमले
मागण्या मान्य : पाचव्या दिवशी १३ शेतकऱ्यांचे उपोषण सुटले
नवेगावबांध : नवेगावबांध जलाशयाच्या पाणीचोरी प्रकरणी पाच गावांतील १३ शेतकऱ्यांनी ६ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्यामुळे उपोषणकर्त्यांनी गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उपोषण सोडले.
नवेगावबांध जलाशयाचे पाणी निस्तार पत्रकानुसार नवेगावबांध, देवलगाव, येरंडी, मुंगली व खोली या पाच गावांना ओलितासाठी लागू आहे. परंतु जलाशयाच्या वरच्या भागातील म्हणजे कोहळीटोली, रांजीटोला, धाबेपवनी, रामपुरी, येलोडी, जांभळी या गावातील काही शेतकऱ्यांनी जलाशयातील पाणी चोरी करुन अवैधपणे रबी धानपिक घ्यायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी तलावापासून तर आपल्या शेतापर्यंत मोठमोठ्या नाल्या खोदल्या. विजेच्या तारावर आकडे टाकून मोटारपंप सुरू केले. एवढेच नव्हे तर इतर लोकांना देखील पाणी विकण्याचा धंदा सुरू केला. तलावाच्या हद्दीत देखील अतिक्रमण करुन पीक घेण्याचा सपाटा यांनी सुरू केला होता.
स्थानिक पाटबंधारे उपविभाग व वीज वितरण कंपनीकडे अनेकदा तक्रारी करून संबंधित पाणी चोरांवर वीज चोरांवर कोणतीच कार्यवाही झाली नाही. यावर्षी जलाशयातील पाण्याची पातळी कमी असल्यामुळे व पाणीचोरी सतत सुरू असल्यामुळे निस्तार हक्क प्राप्त शेतकऱ्यांचे रबी पीक धोक्यात येणार होते. त्यामुळे लाभार्थी पाच गावातील १३ शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला.
उपोषणकर्त्यांमध्ये धनराज पाटील डोंगरवार, जितेंद्र कापगते, माधोराव डोंगरवार, खुशाल काशिवार, योगराज पुस्तोडे, अमृत खुणे, गुलाब कापगते, रवि लंजे, हिरामण कापगते, भरत कापगते, मार्तंड डोंगरवार, मोहन सोनवाने, बालकदास बोरकर यांचा समावेश होता.
उपोषणकर्त्यांच्या मागण्यांनुसार अवैध खोदकाम करुन तयार करण्यात आलेला कालवा पूर्णपणे बुजविण्यात येईल व गट क्रमांक १२९२ मधील तलावाच्या परिसरात केलेले अतिक्रमण पूर्णपणे काढून सीमांकन करण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले. तसेच तलावातील अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर यानंतर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही विभागाने सांगण्यात आले. तसेच तलाव परिसरातील अवैध विद्युत जोडणी काढण्यात येऊन इतर ग्राहकांना देखील कारवाई करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीतर्फे देण्यात आला.
दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनाने अवैध कालवा बुजविण्याचे काम सुरू केले आहे. मागण्या मंजूर करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यामुळे मान्यवरांचे हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषण समाप्त करण्यात आले. यावेळी माजी आ.दयाराम कापगते, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, पालकमंत्र्यांचे सचिव समीर बन्सोडे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता वाकडे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन राठोड, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, मुलचंद गुप्ता, नवलकिशोर चांडक, विजय डोये, रतिराम कापगते, विलास कापगते, विलास पुस्तोडे, बाळकृष्ण डोंगरवार, वेल्हाळ डोंगरवार, भगीरथ डोंगरवार यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजले. (वार्ताहर)
काही अनुत्तरित प्रश्न
सुमारे एक फूट पाण्याची पातळी खाली जाईपर्यंत पाणी चोरण्यात आले, असा विभागाचा अंदाज आहे, याची भरपाई कुणी करावी?
पाणी चोरी करण्यासाठी लहान मोठे सुमारे ३० कालवे खोदण्यात आले. सदर बाब गुगल मॅपवर पण दिसून येते. हे कालवे बुजविण्यासाठी पोकलँड व जेसीबी लावण्यात आले. प्रशासनाला सदर कामाला आलेल्या खर्चाची वसुली कोणाकडून करावी?
सदर पाण्याची चोरी करण्यासाठी चोरीची वीज देखील वापरण्यात आली. वीज गळतीच्या नावाखाली वीज वितरण कंपनीने तो अधिकार इतर ग्राहकांकडून वसूल देखील केला. सदरची अतिरिक्त वसुली कंपनी ग्राहकांना परत करणार काय?