प्रशासनाचा 'तो' फलक दिशाभूल करणारा
By Admin | Updated: September 17, 2015 02:07 IST2015-09-17T02:07:52+5:302015-09-17T02:07:52+5:30
प्रशासनातर्फे नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची होणारी फसगत होण्यापासून वाचविले जाते.

प्रशासनाचा 'तो' फलक दिशाभूल करणारा
साकोली : प्रशासनातर्फे नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची होणारी फसगत होण्यापासून वाचविले जाते. चुकीच्या प्रकाराला आळा बसविण्यात येते. मात्र साकोली येथे तर चक्क प्रशासनच नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येते. ज्या गढकुंभली रोडवरील दोन्ही मंदिरे भुईसपाट करण्यात आली. त्या ठिकाणी पंचायत समितीतर्फे एक फलक लावण्यात आला व या फलकावर कार्यालय पंचायत समिती साकोली असे दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मात्र पंचायत समितीच इथे नाही ही नागरिकांची दिशाभूल नाही काय?
साकोली येथील गढगुंभली रोडवर नवीन तहसील कार्यालयाच्या बाजूला शासकीय जागेवरील अतिक्रमण काल हटविण्यात आले. या जागेवर कार्यालय पंचायत समिती साकोली असा फलक लावण्यात आला. मात्र हा फलक जुना असून आधी हा फलक एकोडी रोड येथे लावला होता. काल मंदिराचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनातर्फे तयारी झाली व ऐन वेळेवरच हा फलक तेथे लावण्यात आला. या फलकावर पंचायत समिती कार्यालय असे लिहिले आहे. प्रत्यक्षात हा फलकच जनतेची दिशाभूल करणारा आहे. तो पाहून कुणालाही धक्काच बसेल, असा प्रकार साकोली येथे सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाच वर्षापूर्वी झाला निधी मंजूर
महामार्ग चौपदरीकरणाचे कामात येथील पंचायत समितीची इमारत पाडण्यात आली. त्यामुळे हे कार्यालय इतरत्र हलविण्यात आले. त्यामुळे प्रशासनातर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील जागेवर व्यापार संकुल व नवीन पंचायत समितीची इमारत तयार करण्याचा प्रस्ताव होता. या पंचायत समितीच्या इमारतीसाठी १ कोटी ८० लाख ९६ हजार रूपयेही मंजूर करण्यात आले होते. मात्र स्थानिक नागरिकांचा विरोध पंचायत समिती जिथे होती त्याच ठिकाणी तयार करा, अशी भूमिका साकोलीवासीयांनी घेतली अखेर हा प्रस्ताव तसाच रखडला व आलेला निधी परत गेला.
परत पाच वर्षानंतर प्रशासनाला अचानक जाग आली व नवीन तहसील कार्यालयाच्या बाजूची जागा निश्चित करण्यात आली. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागात चौकशी केली असता सदर नवीन इमारतीची किंमत ही आजच्या दरानुसार जवळपास ३ ते ४ कोटी रूपयाच्या एवढी जाणार. त्यामुळे या प्रक्रियेला अजूनतरी पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागणार हे निश्चित.