ॲग्रो पार्कमध्ये सहलीसाठी आलेल्या ११ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या कुकला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. १२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २:३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना असून, गुरुवारी (दि. २८) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनी ही सुनावणी केली आहे. पंकज रामेश्वर नेवारे (वय २७, रा. आरंभाघोटी, पो.स्टे. रामपायली, जि. बालाघाट-मध्य प्रदेश) असे आरोपी कुकचे नाव आहे.
गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम नवरगाव येथील एग्रो पार्कमध्ये स्पेशल एज्युकेशन ट्रिप आली होती. त्यावेळी पीडितेला एग्रो पार्कच्या बेडरूममध्ये खेळण्याकरिता ठेवले होते. दुपारी अंदाजे २:३० वाजता तिचे वडील जेवण करीत असताना आरोपी कुक पंकज नेवारे मोबाइलवर बोलत होता. त्यादरम्यान पीडित मुलीचे वडील हे स्टॉलवरून भात घेऊन आले असता त्या ठिकाणी आरोपी दिसून आला नाही. तेव्हा पीडिताचे वडील बेडरूमकडे पाहण्यास गेले तेव्हा आरोपी हा पीडितेवर अत्याचार करताना दिसला. त्याला बाहेर काढले असता लोक गोळा झाले व पोलिस ठाण्यात नेत असताना हाताला झटका देऊन पंकज नेवारे पळून गेला. गतिमंद मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६(२)(आय),(जे)(एल) सहकलम ३(२)(व्ही)३(१)(डब्ल्यू)(आयआय)(आय) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, ४, ६ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांनी केला होता. या प्रकरणात गुरुवारी (दि. २८) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनी सुनावणी करीत आरोपीला शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी वकील सतीश घोडे यांनी पीडितेची बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक फौजदार प्रकाश सिरसे यांनी काम पाहिले.अशी सुनावली शिक्षाया प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनी २० वर्षांची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक महिन्याची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. या प्रकरणात सरकारी वकील घोडे यांनी १६ साक्षीदार न्यायालयात तपासले. यात दोन डीएनए एक्सपर्ट साक्षीदार तपासले. पीडितेचे ९० टक्के ब्रेन इनॲक्टिव्ह आहे. तिला चालता, बोलता येत नाही. अशा अगतिक मुलीवर त्या नराधमाने अत्याचार करून मानवतेला काळिमा फासला आहे.