भेसळखोरांना अभय; फक्त १४ नमुने घेतले
By Admin | Updated: October 29, 2016 01:10 IST2016-10-29T01:10:37+5:302016-10-29T01:10:37+5:30
दिवाळीच्या मुहूर्तावर गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात भेसळखोरी होत आहे.

भेसळखोरांना अभय; फक्त १४ नमुने घेतले
नाममात्र कारवाई : भेसळखोरांशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे?
गोंदिया : दिवाळीच्या मुहूर्तावर गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात भेसळखोरी होत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. कारवाई करण्याचा केवळ देखावा करीत फक्त १४ ठिकाणचे नमुने घेऊन तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत. त्या नमुन्यांचा अहवाल काही महिन्यांनी येईपर्यंत सर्व भेसळयुक्त मिठाई व इतर पदार्थ गोंदियावासीयांकडून फस्त केले जाणार आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेसळखोरी होत आहे. मिठाई, तेल व खोवा यात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. परंतु अन्न प्रशासन विभागाने महिनाभरात फक्त पाच कारवाई केल्या आहेत. त्या कारवाया मोठ्या व्यापाऱ्यांवर होणे अपेक्षित होते. परंतु मोठ्या माश्यांना सोडून छोटया माश्यांना जाळ्यात अडकविण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणातून १४ नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठिवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. परंतु दिवाळीत विक्री होत असलेल्या साहित्याच्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल दिवाळीनंतर येणार असल्याने त्यानंतर अधिकारी त्या अहवालानुसार कारवाई करणार की नाही ही शंकाच आहे.
घेतलेल्या नमुन्यांपैकी काही नमुन्यात भेसळ आढळली असेल तर त्या दुकानातील साहित्य तर मोठ्या प्रमाणात बिनधास्त विक्रीला जात आहेत. तो व्यापारी भेसळयुक्त साहित्यातून आपली कमाई करणार आहे. त्यातून मिळालेल्या मिळकतीतून अधिकाऱ्यांना त्यांचा वाटा देऊन मॅनेज करण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल दिवाळीनंतर येणार असल्याने भेसळखोरांना अभय आहे. (तालुका प्रतिनिधी)
छोट्या व्यापाऱ्यांवर पाच कारवाया
अर्जुनी-मोरगावच्या महागाव येथील प्रेमबंद पमनदास साधवानी यांच्या दुकानातून ३० हजार १२५ रूपयाची तंबाखू जप्त केली. ही कारवाई १८ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. गोंदियाच्या नगर परिषद समोरील मे. गुरूनानक चिरोजी भंडार मधून ८८.४ किलो तेल किंमत ५ हजार ७४६ रूपयाचा माल, महागाव येथील साई किराणा स्टोर्स मधून ४०३.४०० किलोचे तेल किंमत २८ हजार २३८ रूपयाचा माल प्ति करण्यात आला. जय बाबा टेडर्स माताटोली गोंदिया व मे. शिव आॅईल मील मधून अनुक्रमे ३३ हजार ९६६ व २३ हजार २०० रूपयाचा माल जपत करण्यात आला आहे.