शाळेत कर्तव्यावर असतानाच शिक्षकाचा मृत्यू; आठ महिन्यापूर्वी झाले होते रुजू
By अंकुश गुंडावार | Updated: December 13, 2025 23:43 IST2025-12-13T23:41:33+5:302025-12-13T23:43:17+5:30
झुरकुटोला शाळेतील घटना, आंतरजिल्हा बदलीने झाले होते रुजू

शाळेत कर्तव्यावर असतानाच शिक्षकाचा मृत्यू; आठ महिन्यापूर्वी झाले होते रुजू
गोंदिया : पंचायत समिती अंतर्गत डव्वा केंद्रातील झुरकुटोला येथील एक शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक नितीन गोस्वामी (३८) यांचे शाळेतच कार्यरत असतांना शनिवारी (दि.१३) सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार शनिवार सकाळी नेहमीप्रमाणे शिक्षक नितीन गोस्वामी हे काम करीत होते. दरम्यान ते कर्तव्यावर असताना अचानक भोवळ येऊन खाली कोसळले. दरम्यान विद्यार्थ्यांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी शाळेत धाव घेत शिक्षक नितीन गोस्वामी यांना बेशुद्ध अवस्थेत डव्वा येथील डाॅक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी शाळेत आणि गावात पसरताच दु:खाचे वातावरण निर्माण झाले.
आठ महिन्यापूर्वी झाले होते रुजू
शिक्षक नितीन गोस्वामी हे आंतरजिल्हा बदलीने आठ महिन्यापूर्वीच झुरकुटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रुजू झाले होते. त्यांनी शाळेत रुजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष दिले. असे शिक्षक ह्यापूर्वी आमच्या गावात आलेच नाही, असे गावाकऱ्यांनी सांगितले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्व विद्यार्थी व गावकर्यांनी दवाखान्यात शिक्षकाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
शिक्षक नितीन गोस्वामी हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. विद्यार्थी व शाळेविषयी त्यांना आपुलकी होती. त्यांच्या निधनाने विद्यार्थी व गावकऱ्यात शोककळा पसरली आहे. - प्रशांत बालसनवार,सरपंच, पाटेकुर्रा.