डवकी नाल्यावर भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, सात जण जखमी
By अंकुश गुंडावार | Updated: December 19, 2025 18:30 IST2025-12-19T18:24:47+5:302025-12-19T18:30:44+5:30
Gondia : देवरी-आमगाव राष्ट्रीय महामार्ग क्र.२५३ वरील डवकी नाल्यावरील पुलावर शुक्रवारी (दि.१९) दुपारी दीड वाजताच्या सुमारास थरकाप उडवणारा अपघात घडला.

A speeding car hits two two-wheelers on Dawki Nallah, seven people injured
देवरी : देवरी-आमगाव राष्ट्रीय महामार्ग क्र.२५३ वरील डवकी नाल्यावरील पुलावर शुक्रवारी (दि.१९) दुपारी दीड वाजताच्या सुमारास थरकाप उडवणारा अपघात घडला. एका भरधाव अज्ञात अनियंत्रीत कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यात दोन लहान मुलांसह सात जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आमगावकडून देवरीकडे एक कार अत्यंत वेगाने येत होती. देवरीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या डवकी नाल्यावरील पुलावर या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. ही धडक ऐवढी जोरदार होती एका दुचाकीचे समोरचे चाक निखळून पडले. या घटनेनंतर कारचालक जखमींना वाऱ्यावर सोडून कारसह घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान या मार्गावरुन जात असलेल्या वाहन चालक व नागरिकांनी थांबून घटनेची माहिती देवरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी गोंदिया येथे रेफर केले. याप्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला पसार झालेल्या कारचा शोध पोलिस घेत आहेत.
जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश
गोपिका नितेश अग्रवाल (२८, रा. मुरपार), हर्ष नितेश अग्रवाल (३, रा.मुरपार),जतिन नितेश अग्रवाल (६,रा. मुरपार), सीताबाई रामाजी मेश्राम (७०, रा. मुरपार), रोहित मांढरे (३५, रा. लाखनी), आशिष रमेश रहांगडाले (२४, रा. कलगाव), संतकला नेतराम कुंभरे (२८, रा. बागरेकसा, छत्तीसगड) यांचा समावेश आहे. देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर डॉ.अमित येडे यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, सर्वांना हात आणि पायाचे फ्रॅक्चर असल्याने तसेच दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केल्याचे डॉक्टरांनी सांगितले.