२७,०७६ शेतकऱ्यांना ९३.६८ कोटींचे कर्ज वाटप

By Admin | Updated: July 12, 2014 01:24 IST2014-07-12T01:24:00+5:302014-07-12T01:24:00+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत खरीप पीक कर्ज वाटप सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २७ हजार ०७६ लाथार्थी शेतकऱ्यांना ....

9.38 crores loan disbursement to 27,076 farmers | २७,०७६ शेतकऱ्यांना ९३.६८ कोटींचे कर्ज वाटप

२७,०७६ शेतकऱ्यांना ९३.६८ कोटींचे कर्ज वाटप

देवानंद शहारे गोंदिया
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत खरीप पीक कर्ज वाटप सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २७ हजार ०७६ लाथार्थी शेतकऱ्यांना ९३६८.२९ लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत एकूण ४४ हजार ३७० लाभार्थी शेतकऱ्यांना १३ लाख ४९० रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १७ हजार २९४ शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केली नाही. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या यंदा बँकांना ४१२१.७१ लाख रूपये वाटप करता आले नाही.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पावसाची चिंता सतावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची वाट न बघता शेतात आवत्या घालण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात रोवणीच्या क्षेत्रापेक्षा आवत्यांचे क्षेत्र अधिक वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ९५६ हेक्टर क्षेत्रामध्येच रोवणी करण्यात आली. तर एकूण १२ हजार २१४ हेक्टर क्षेत्रामध्ये आवत्या घालण्यात आल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे. तसेच आतापर्यंत १६ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवाटिका घालण्यात आल्या आहे. मक्याचे सध्याचे क्षेत्र ५२ हेक्टर असून चार हजार ५४९ हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड करण्यात आली आहे. तिळाची लागवड ३३४ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १४,६४४ लाख रूपये आहे. यंदा गोंदिया मध्यवर्ती सहकारी बँकेने २६ हजार ००८ हेक्टर क्षेत्रासाठी २४ हजार २६७ सभासदांना ७७९२.२९ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी एक हजार ५९९ सभासदांना ८७८ लाख रूपये व ग्रामीण बँकेने एक हजार २१० सभासदांना ६९८ लाख रूपयांचे असे एकूण ९३६८.२९ लाख रूपये पीक कर्ज वाटप केले आहे. आतापर्यंत एकूण ६४ टक्के सभासदांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. कृषी विभागाने दिलेल्या संख्येनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी शेतकऱ्यांनी कर्जाचे उचल केल्याचे दिसते.

Web Title: 9.38 crores loan disbursement to 27,076 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.