९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
By अंकुश गुंडावार | Updated: September 20, 2024 23:47 IST2024-09-20T23:45:26+5:302024-09-20T23:47:14+5:30
अनियमितता आढळल्याचा ठपका

९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
गोंदिया: जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी-बियाणे, खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने नऊ भरारी पथके स्थापन केली आहेत. तसेच २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळल्याने ९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर आठ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.
कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, आदी कारणांमुळे आठ कृषी केंद्रांचे परवाने दोन महिन्यांसाठी निलंबित केले. शेतकऱ्यांना त्यांच्यात गावात कृषी निविष्ठा उपलब्ध व्हावे म्हणून शैक्षणिक पात्रता असलेल्या अर्जदारांना परवाना देण्यात आले होते; परंतु कृषी केंद्र संचालक यांनी परवान्यामध्ये नमूद घर क्रमांकावर कृषी केंद्र उघडलेले नसून बियाणे, खते व कीटकनाशकाच्या परवान्यावर कोणतेही खरेदी-विक्री न करणे व कोणतेही दस्तऐवज जतन न केल्याने ९९ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले.
हे कृषी केंद्र दोन महिन्यांसाठी निलंबित
एस. आर. कृषी केंद्र दांडेगाव, ता. गोंदिया बियाणे, खते व कीटकनाशके परवाना २ महिन्यांकरिता, शेतकन्या महिला शेतकरी उत्पादक कंपनी, दांडेगाव, ता. गोंदिया बियाणे, खते व कीटकनाशके परवाना २ महिन्यांकरिता, मों. गायत्री कृषी केंद्र मेंढा, ता. तिरोडा बियाणे, खते व कीटकनाशके परवाना २ महिन्यांकरिता असे एकूण ८ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.