९४८६ गावे तंटामुक्तीच्या मार्गावर
By Admin | Updated: December 26, 2016 01:06 IST2016-12-26T01:06:52+5:302016-12-26T01:06:52+5:30
गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, क्षुल्लक वादाचे पर्यवसान मोठ्या वादात होऊ नये, गाव गाड्यातूनच तंट्याचा

९४८६ गावे तंटामुक्तीच्या मार्गावर
दोन वर्षापासून तंटामुक्त गावांची घोषणाच नाही
जातीय सलोखा राखून तंट्यावर केली मात
१८ हजार ४२३ गावांत वाहते शांततेचे वारे
नरेश रहिले ल्ल गोंदिया
गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, क्षुल्लक वादाचे पर्यवसान मोठ्या वादात होऊ नये, गाव गाड्यातूनच तंट्याचा निपटारा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेत अख्या महाराष्ट्रात लोकचळवळ निर्माण झाली. त्यामुळे सातवर्षात १८ हजार ४२३ गावे तंटामुक्त झालीत. उर्वरीत ९ हजार ४८६ गावे तंटामुक्त होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र शासनाने दोन वर्षापासून तंटामुक्त गावांची घोषणा केली नाही.
राज्यात २७ हजार ८९१ ग्राम पंचायती आहेत. यापैकी महाराष्ट्रातील १८ हजार ४२३ गावे तंटामुक्त ठरली. या गावांना मागील सात वर्षात ४३८ कोटी १८ लाख ६७ हजार रूपये बक्षीस देण्यात आले. या बक्षीस रकमेतून गावाचा विकास करण्यात आला आहे.
लोकसहभागातून गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवितांना न्यायालयाच्या व पोलिसांच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी झाला. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले तंटे सामोपचाराने गावातच सोडविण्यासाठी गावातीलच विविध घटकांना एकत्र करून त्यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीने गावात आमूलाग्र बदल केला आहे. १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झालेल्या या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावात शांततेची मशालच पेटविली आहे. ही मोहीम राबवून शासनाच्या निकषानुसार तंटामुक्त गाव मोहीम म्हणून पुढे आलेल्या तंटामुक्त गावांना लोकसंख्येच्या आधारावर शासनाने बक्षीसे वाटली. यात २००७-०८ या वर्षात २३२८ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ४८ कोटी ९० लाख ५० हजार रुपये मिळाली. २००८-०९ या वर्षात २८९१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ६८ कोटी ८३ लाख १७ हजार रुपये, २००९-१० या वर्षात ४२४९ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी १०१ कोटी ५५ लाख २५ हजार रुपये, २०१०-११ या वर्षात ३८२४ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ९३ कोटी ७१ लाख रुपये, २०११-१२ या वर्षात २७१२ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ६९ कोटी ५९ लाख २५ हजार रुपये, २०१२-१३ या वर्षात १७४१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये, २०१३-१४ या वर्षात ६७८ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ८ कोटी ९९ लाख ७५ हजार रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
सामाजिक उपक्रमात अग्रेसर
४गावातील अवैध धंद्याना आळा घालून ते धंदे करणाऱ्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविले. स्त्रीभ्रुण हत्येवर आळा घालण्यासाठी कन्यारत्न जन्मानंद भेट मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा गौरव, नवविवाहित मुलींना माहेरभेट, जातीय सलोखा , हुंडाबंदी करण्यात आली. आंतरजातीय विवाह घडवून आणला. समाजातील अनिष्ट चालीरीती परंपरा यावर आळा घातला. सण, उत्सव सामूहिकरीत्या शांततेत पार पाडणे सुरू आहे. महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जेष्ठ नागरिकांचा सन्मान, विधवा, परित्यक्ता यांना मदत, वृक्षारोपण करण्यात आले. या शिवाय गावाला शांततेच्या मार्गाने गावाचा विकास करण्यावर या योजनेच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे. तंटामुक्त गाव मोहीम सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.