बर्ड फ्लूच्या भीतीने ८८०० कोंबड्या ‘स्वाहा’ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:17+5:302021-01-25T04:30:17+5:30
गोंदिया : राज्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केला असून त्यामुळे पशूसंवर्धन विभागाचे टेन्शन वाढले आहे. अशात बर्ड फ्लू हा धोका ...

बर्ड फ्लूच्या भीतीने ८८०० कोंबड्या ‘स्वाहा’ ()
गोंदिया : राज्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केला असून त्यामुळे पशूसंवर्धन विभागाचे टेन्शन वाढले आहे. अशात बर्ड फ्लू हा धोका लक्षात जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील ग्राम निंबा येथील एका पोल्ट्री फार्ममधील ८८०० कोबड्यांना जमिनीत पुरण्यात आले. शनिवारी (दि.२३) पशूसंवर्धन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
आमगाव येथील डॉ. शशांक रामचंद्र डोये यांच्या निंबा येथील श्रृतीज पोल्ट्री फार्मवर १० हजार कोंबडीची पिले ३७ दिवसांपूर्वी खरेदी करण्यात आली होती. ४२ रूपये प्रती नग हिशेबाने त्यांनी या कोंबड्या खरेदी केल्या होत्या. ३७ दिवसांत प्रती कोंबडी ३ ते ४ किलो दाणा देण्यात आला व त्यामुळे ३७ दिवसांत हे पिल्लू १ किलो ९०० ग्रॅम वजनाचे झाले होते. यामुळे त्यांची किंमत आजघडीला १४० रूपये झाली असताना बर्ड फ्लू मुळे डॉ. डोये यांच्या पोल्ट्री फार्मवरील ८८०० जीवंत कोंबड्या जेसीबीने खड्डा खोदून पुरण्यात आल्या. बर्ड फ्लूच्या दहशतीमुळे स्वत: जिल्हा पशूसंवर्धन विभागाच्या यंत्रणेने या कोंबड्यांना मारून जमिनीत पुरण्याचे काम शनिवारी (दि.२३) केले.
--------------
बॉक्स
१२.३२ लाखांचे नुकसान
बर्ड फ्लूच्या दहशतीने डॉ. डोये यांच्या १२ लाख ३२ हजार रूपये किमतीच्या जीवंत कोंबड्या जमिनीत पुरण्यात आल्या आहेत. त्यांची एक कोंबडी १४० रूपये किमतीची होती. परंतु त्यांना नुकसान भरपाई म्हणून केंद्र शासनाकडून १० रूपये तर राज्य सरकार १० रूपये असे २० रूपये एका कोंबडीमागे देणार आहे. म्हणजेच डॉ. डोये यांना १२ लाख ३२ हजार रूपयांच्या नुकसानीपोटी एक लाख ७६ हजार रूपये भरपाई देण्यात येईल असे समजते.