नऊ ग्रामपंचायतीत निवडले जातील ८१ सदस्य
By Admin | Updated: March 29, 2015 01:43 IST2015-03-29T01:43:44+5:302015-03-29T01:43:44+5:30
तालुक्यातील एकूण १० ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या जून महिन्यात संपणार होता.

नऊ ग्रामपंचायतीत निवडले जातील ८१ सदस्य
विजय मानकर सालेकसा
सालेकसा- तालुक्यातील एकूण १० ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या जून महिन्यात संपणार होता. त्यामुळे पुढील दोन महिने निश्चितपणे ग्रामपंचायतींवर शासन करीत असतानाच अचानक ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून निवडणूक आयोगाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एकीकडे निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे, तर दुसरीकडे इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे मार्च महिना संपण्यापुर्वीच राजकीय वातावरणात तापत आहे.
तालुक्यातील एकूण ४२ ग्राम पंचायतीपैकी १० ग्राम पंचायतीचा कार्यकाळ दोन महिन्याचा शिल्लक राहिला आहे. त्यात सालेकसा ग्राम पंचायतीला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्याने ती आधीच यातून बाद झाली आहे. त्यामुळे आता येत्या २२ एप्रिलला एकूण नऊ ग्राम पंचायतीत निवडणुका रंगणार आहेत. एकूण नऊ ग्राम पंचायतीत ८१ सदस्य निवडून येतील. यात ४५ महिला आणि ३६ पुरुष सदस्य असून महिला ५५ टक्के तर पुरुष ४५ टक्के राहतील. त्यात एका ग्रामपंचायतच्या एका जागेवर पोटनिवडणुकीत सुद्धा महिला सदस्य निवडली जाणार आहे.
ज्या नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहेत, त्यात कारुटोला येथे एकूण ११ सदस्य आहेत. त्यात सहा महिला व पाच पुरुष, कावराबांध येथे ११ सदस्यांपैकी सहा महिला, पाच पुरुष, कोटजामुरा येथे सात सदस्यांपैकी चार महिला व तीन पुरुष, कोटरा येथे नऊ सदस्यांमध्ये पाच महिला व चार पुरुष, मानागड येथे एकूण सात सदस्यांमध्ये चार महिला व तीन पुरुष, मुंडीपार येथे ११ सदस्यांमध्ये सहा महिला व पाच पुरुष, पाऊलदौना येथे नऊ सदस्यांमध्ये पाच महिला चार पुरुष, पोवारीटोला येथे सात सदस्यांमध्ये चार महिला व तीन पुरुष, सातगाव येथे नऊ सदस्यांमध्ये पाच महिला आणि चार पुरुष तसेच दरेकसा येथे एक महिला सदस्य निवडण्यात येणार आहे.
सदस्यपदाचे आरक्षण आधीच जाहीर झालेले आहेत. नऊ ग्राम पंचायतीच्या एकूण ८१ सदस्यांमध्ये अनुसूचित जातीचे सहा सदस्य, अनुसूचित जमातीचे १६ सदस्य, नागरिकांचा मागास प्रवर्गाचे २० आणि सर्वसाधारण महिला १७ तर सर्वसाधारणचे एकूण २२ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे.
विविध ग्रामपंचायतींचे आरक्षण
कारुटोला ग्राम पंचायतीत अनुसूचित जाती महिला एक, अनुसूचित जमाती महिला एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन पुरुष एक, सर्वसाधारण महिला दोन आणि सर्वसाधारण चार असे एकूण अकरा सदस्य निवडुण येतील. कावराबांध ग्राम पंचायतीत अनुसूचित जाती जमातीसाठी कोणतेच आरक्षण नसून येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन पुरुष एक सर्वसाधारण महिला चार आणि सर्वसाधारण चार असे एकूण अकरा सदस्य निवडले जातील. कोटजमूरा ग्रामपंचायत येथे अनुसूचित जाती महिला एक, नामाप्र महिला एक पुरुष एक, सर्वसाधारण महिला दोन आणि सर्वसाधारण दोन असे एकूण सात सदस्य निवडले जातील. कोटरा येथे अनू जाती महिला एक, अनुजमाती महिला दोन, पुरुष एक, नामाप्र महिला एक, पुरुष एक सर्वसाधारण महिला एक आणि सर्वसाधारण दोन असे एकूण नऊ सदस्य निवडले जातील. मानागड येथे सात पैकी अनुसूचित जामातीचे तीन महिला तीन पुरुष आणि एक नामाप्र महिला सदस्य राहिल. मुंडीपार येथे अनु.जाती महिला एक, अनु.जमाती महिला पुरुष प्रत्येकी एक, नामाप्र महिला दोन पुरुष एक, सर्वसाधारण महिला दोन आणि सर्वसाधारण तीन असे एकूण अकारा सदस्य निवडले जातील. पाऊलदोना येथे नऊ जाती व जमातीची प्रत्येकी एक महिला, नामाप्रचे प्रत्येक एक महिला पुरुष तर दाने सर्वसाधारण महिला आणि तीन सदस्य सर्वसाधारण निवडुण येतील. पोवारीटोला येथे अनु.जातीसाठी आरक्षण नसून अनु. जमातीसाठी एक महिला एक पुरुष तर नामप्रसाठी ही प्रत्येकी एक महिला पुरुष आणि दोन महिला सर्वसाधारण तर एक सर्वसाधाण पदासाठी राहील. सातगाव येथे अनु.जाती, जमातीची प्रत्येकी एक महिला, नामाप्रची एक महिला एक पुरुष आणि सर्वसाधारण महिला दोन तर खुल्या प्रवर्गाचे तीन सदस्य निवडले जातील, विशेष म्हणजे अनु. जातीचे सर्व सहा सदस्य महिलासाठीच राखीव आहेत. आणि ते कारुटोला, कोटजमूरा, कोटरा, मुंडीपार, पाऊलदोना, पोवारीटोला आणि सातगाव येथे प्रत्येकी एक सदस्याचा समावेश आहे.