शहरात तयार झाले ८ कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:27+5:302021-04-10T04:28:27+5:30

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. त्यातही गोंदिया शहर हॉटस्पॉट असून ...

8 containment zones have been created in the city | शहरात तयार झाले ८ कंटेन्मेंट झोन

शहरात तयार झाले ८ कंटेन्मेंट झोन

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. त्यातही गोंदिया शहर हॉटस्पॉट असून सर्वाधिक रूग्ण शहरातूनच निघत आहेत. हेच कारण आहे की, आजघडीला शहरातील एकही भाग कोरोनाच्या प्रादुर्भावापासून सुटलेला नाही. परिणामी शहरात ८ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून येथे एकूण ६९ कोरोना बाधित आढळून आले असल्याने या भागांना कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्याची पाळी आली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून दररोजचा वाढता आकडा बघता स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. गुरुवारपर्यंत (दि. ८) जिल्ह्यातील बाधितांची संख्या १८७९६ एवढी झाली होती व त्यात २८३२ रुग्ण क्रियाशील आहेत. एकट्या गोंदियातील तालुक्यातील स्थिती बघितल्यास तालुक्यात १६५७ क्रियाशील रुग्ण असून यातील ९८९ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. मात्र घरीच अलगीकरणात राहून अशा या रुग्णांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. या रुग्णांनी घराबाहेर पडणे वर्ज्य असतानाही ते बाहेर फिरत असल्याचे प्रकार घडतात व त्यामुळे अन्य व्यक्तींनाही ते बाधित करीत असल्याचे प्रकार घडले आहेत.

असले प्रकार घडू नये व घरीच अलगीकरणात असलेल्या रुग्णांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करता यावा. तसेच बाधित असलेल्या परिसरात अन्य नागरिकांना वावर राहून प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने आरोग्य विभागाने तेवढा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये टाकून सील करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. यामुळेच शहरात बाधितांची संख्या जास्त असलेल्या ८ भागांत कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. या कंटेन्मेंट झोनमध्ये ६९ क्रियाशील रुग्ण असून तेवढा परिसर सील करण्यात आला आहे.

---------------------------

जिल्ह्यात २० कंटेन्मेंट झोन

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली असून प्रत्येकच तालुका बाधित झाला आहे. परिणामी शहरातील ८ कंटेन्मेंट झोन पकडून एकूण २० कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ३४१ क्रियाशील रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही आता बाधितांची संख्या वाढतच असल्याने कंटेन्मेंट झोनच्या संख्येत आणखी वाढ होणार यात शंका नाही.

------------------------

झाशीनगर व घिवारीत स्फोट

कोरोनाच्या बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ बघता अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर या गावात तब्बल ५६ तर गोंदिया तालुक्यातील घिवारी या गावात ४३ बाधित आढळून आल्याने एकप्रकारे स्फोटच झाला आहे. तर गोंदिया शहरातील डब्लिंग परिसर, शास्त्री वॉर्ड व मनोहर कॉलनीही यापासून सुटलेले नाही.

--------------------------

शहरात तयार करण्यात आलेले कंटेन्मेंट झोन

परिसर लोकसंख्या क्रियाशील रुग्ण

- रेल्वे डब्लिंग कॉलनी १३ ११

- रेल्वे कॉलनी गौतमनगर ०६ ०६

- गौरीनगर, गणेशनगर ३४ ०६

- एकता कॉलनी १०५ ०८

- शास्त्री वॉर्ड ५७ ०७

- लक्ष्मी राईस मिल, शास्त्री वॉर्ड १४८ ११

- साईनगर फेंडारकर वॉर्ड ६४ ०७

- मनोहर कॉलनी, रामनगर ६५ १३

एकूण ४९२ ६९

Web Title: 8 containment zones have been created in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.