७९ कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: February 23, 2015 02:03 IST2015-02-23T02:03:24+5:302015-02-23T02:03:24+5:30

गेल्या १५ वर्षापासून हिवतापापासून जिल्हावासीयांचा बचाव करण्याचे काम फवारणी कामगार करीत आहेत. त्यांना स्थायी करण्याचे आदेश आॅक्टोबर २०१३ मध्ये धडकले.

79 staff waiting for justice | ७९ कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

७९ कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

गोंदिया : गेल्या १५ वर्षापासून हिवतापापासून जिल्हावासीयांचा बचाव करण्याचे काम फवारणी कामगार करीत आहेत. त्यांना स्थायी करण्याचे आदेश आॅक्टोबर २०१३ मध्ये धडकले. मात्र, अद्याप त्यासंदर्भात विभागाचे कार्यवाही केली नाही. परिणामी कर्मचारी अद्याप तोकड्या मानधनावरच काम करीत आहेत. तुटपुंज्या वेतनावर त्यांना जीवन जगावे लागत आहे.
मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात साथीच्या आजारांनी मृत्यूला कवटाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच जणांचा हिवतापाने मृत्यू होतो. शासन यावर आळा घालण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे रोगांवर आळा घालण्यात विभागाला सातत्याने अपयश येत आहे.
साथीच्या आजारांत कीटकजन्य आजारांवर आळा घालण्याकरिता फवारणी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. मग १५ वर्षापासून कार्यरत ७९ कर्मचारी घरोघरी जाऊन फवारणी करतात. त्यांना मानधन म्हणून १९१ आणि २३० रुपये मोबदला दिला जातो.
गोंदिया तालुक्यात २३, आमगाव २७, अर्जुनी मोरगाव ४, देवरीत ८, गोरेगावात ६ कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना स्थायी करण्याची मागणी जोर धरत आहे. मागणीवर सकारात्मक भूमिका घेत शासनाने २८ आॅक्टोबर २०१३ रोजी सर्व सफाई कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्ह्यात फवारणीच्या कामावर असलेले कामगार फक्त सातवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतले असल्याच्या कारणावरुन त्यांना अद्याप कायम करण्यात आले नाही.
आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचविणाऱ्यांची कीव येथील जिल्हा हिवताप विभागाला अद्याप तरी आली नाही. यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील यांना विचारले असता फवारणी कामगार दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले नसल्याने कायम करण्यात अडचण येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षणाच्या अटीमुळे कामगारांना रोजंदारीवरच जीवन काढावे लागणार काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय सहावा वेतन आयोग, सेवानिवृत्ती आदी प्रश्न देखील प्रलंबित आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर याकडे ते हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे फवारणी कामगार अडचणीत आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 79 staff waiting for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.