२५ दिवसात वाढले ७६९ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:00:36+5:30
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. १ ते २५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधितांची सरासरी काढल्यास दररोज ५२ कोरोना बाधितांची भर पडल्याचे दिसून येते. तर पाच महिन्याच्या कालावधीत सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर २५ ऑगस्टपर्यंत ८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

२५ दिवसात वाढले ७६९ कोरोना रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर तब्बल दीड महिना कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नव्हती. मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात २८८ कोरोना बाधित आढळले. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून २५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ७६९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात कोरोनाचा स्फोट झाला असून आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. १ ते २५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधितांची सरासरी काढल्यास दररोज ५२ कोरोना बाधितांची भर पडल्याचे दिसून येते. तर पाच महिन्याच्या कालावधीत सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर २५ ऑगस्टपर्यंत ८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांसह कोरोनाने मृत्यू होण्याच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे.
ऑगस्ट महिन्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शहरी भागासह ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा वेगाने शिरकाव होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाला प्रतिबंध लावण्यात जिल्हा आणि आरोग्य प्रशासन सुध्दा अपयशी ठरले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार पुढे येत आहे.
कोविड केअर आणि क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा आणि गैरसोयीमुळे या रुग्ण या ठिकाणी राहण्यास तयार नाही. तर अनेकजण बाहेरुन परतल्यानंतर याची माहिती प्रशासनाला देण्याचे टाळत आहेत. यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना शासकीय कार्यालये सुध्दा यापासून दूर राहिले नाहीत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाने शिरकाव झाला आहे. या शासकीय कार्यालयांमधील १५ ते २० अधिकारी कर्मचारी आतापर्यंत कोरोना बाधित आढळले आहे. तर अद्यापही बऱ्याच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरूच आहे. यामुळे सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.
ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मागील पाच महिन्यात कोरोनाने सहा जणांचा मृत्यू झाला. तर आॅगस्ट महिन्यात कोरोनाने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०६९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आॅगस्ट महिना जिल्हावासीयांसाठी चिंताजनक ठरला.
आरोग्य विभागात रिक्त पदांची समस्या
मागील पाच महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार निश्चितच वाढला आहे. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाºयांची बरीच पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील १२०० लोकांमागे सध्या १ आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. पण आरोग्य विभागातील रिक्त पदे अद्यापही भरण्यात आली नाही. त्यामुळे समस्येत अधिक वाढ होत आहे.