कुपोषणाने ७३ बालकांचा मृत्यू

By Admin | Updated: May 18, 2015 00:47 IST2015-05-18T00:47:03+5:302015-05-18T00:47:03+5:30

आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बालमृत्यूची आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे.

73 child deaths due to malnutrition | कुपोषणाने ७३ बालकांचा मृत्यू

कुपोषणाने ७३ बालकांचा मृत्यू

नरेश रहिले गोंदिया
आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बालमृत्यूची आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. याबाबीत आरोग्य विभागाकडून वर्षभरात आठच बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची ६५ बालक तर अतितीव्र्र कमी वजनाची आठ अशी एकूण ७३ बालके वर्षभरात दगावली आहेत. यातून जिल्ह्यात कुपोषण मोठ्या प्रमाणात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च १०१५ या काळात गोंदिया जिल्ह्यात १८ हजार ६६८ बालके जन्मली. त्यात ग्रामीण भागात १२ हजार ४४४ बालके तर शहरी भागात ६ हजार २२४ बालके जन्मली आहेत. यात ग्रामीण भागातील २११ तर शहरी भागातील २७६ बालकांचा अशा एकूण ४८७ बालकांचा वर्षभरात विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. याशिवाय सामान्य श्रेणीतील ९५ बालके, कमी वजनाची ४३ बालके, तर कुपोषणाच्या श्रेणीतील तीव्र्र कमी वजनाची ६५ बालके तर अतितीव्र कमी वजनाची आठ बालके दगावली आहेत. अशाप्रकारे तीव्र व अतितीव्र्र कमी वजनाची ७३ बालके दगावली आहे.
कुपोषण मुक्तीसाठी शासन मोठे प्रयत्न करीत असले तरीही गोंदिया जिल्ह्यात कुपोषण थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. परंतु तीव्र्र कमी वजनामुळे मृत्यू झालेल्या बालकांच्या मृत्यूला आरोग्य विभाग कुपोषणाने मृत्यू मानत नाही. अती तीव्र कमी वजनाच्या बालकांनाच कुपोषित समजून त्यांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याचे मानते. ज्यांचे वजन तीव्र कमी आहे ते कुपोषित नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात कुपोषणाने फक्त आठ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभाग देतो.
गोंदिया जिल्ह्यात तीव्र व अतितीव्र्र वजनाने ७३ बालकांचा मृत्यू झाला असला तरी महिला व बालकल्याण तसेच आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
अंगणवाडीच्या तीन श्रेणी
आंगणवाडी कडून बालकांची पाहणी करताना तीन श्रेणीत त्यांच्याकडून पाहणी होते. पहिली श्रेणी सर्वसाधारण, दुसरी श्रेणी कमी वजन व तिसरी श्रेणी तीव्र कमी वजन असते. कमी वजन व तीव्र कमी वजनाची बालके कुपोषणाच्या वाटेवर असतात. परंतु वेळेत त्यांना संकरीत आहार मिळाला तर त्यांच्यात बदल होऊन ते सामान्य श्रेणीत येतात. तीव्र कमी वजनाच्या बालकांना कुपोषित समजण्यात येते. जिल्ह्यात या श्रेणीतील ७३ बालके मृत्युमुखी पडली आहेत.
महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
गोंदिया जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. ग्रामीण भागातील महिला गर्भवती असतानाही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. गर्भावस्थेतही त्यांना संकरीत आहार मिळत नसल्यामुळे त्यांच्या पोटात असलेले बाळ कुपोषित म्हणून जन्माला येते. हेच कारण आहे की गर्भवती मातांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष त्यांच्या बाळांच्या माध्यमातून पुढे येते. कुपोषण हे त्याचेच परिणाम आहे.

Web Title: 73 child deaths due to malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.