७१४१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:40+5:30
कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांवर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. बुधवारी (दि.२२) तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. तर गोंदिया येथील सिव्हिल लाईन परिसरात एक कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने त्याला येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

७१४१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७४७८ स्वॅब नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यापैकी २३६ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले.तर ७१४१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. २० स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. तर ८७ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे.मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांवर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. बुधवारी (दि.२२) तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. तर गोंदिया येथील सिव्हिल लाईन परिसरात एक कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने त्याला येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २११ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या २३६ वर पोहचली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत १९ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून परतणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात २७६ जण संस्थात्मक क्वारंटाईन तर १०५५ जण होम क्वारंटाईन आहेत.
७६६ जणांची अँटीजेन रॅपिड टेस्ट
कोरोना विषाणूचा जिल्ह्यात संसर्ग वाढू नये, यासाठी कोरोना संशयित असलेल्या किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७६६ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ७६१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर पाच व्यक्ती या अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहे.
जिल्ह्यात २४ कंटेन्मेंट झोन
कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कंटेन्मेंट झोन घोषीत केले जात आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत एकूण २४ कंटेन्मेंट झोन आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील मुंडीपार,फतेहपूर, डोंगरगाव, सेजगाव,पारडीबांध, कुंभारेनगर व सिव्हिल लाईन, सालेकसा तालुक्यातील पाऊलदौना, रामाटोला, पाथरी व शारदानगर, तिरोडा तालुक्यातील तिरोडा (सुभाष वॉर्ड), बेरडीपार, बेलाटी/खुर्द, वीर सावरकर वार्ड, भुतनाथ वार्ड, किल्ला वार्ड आणि गराडा, गोरेगाव तालुक्यातील भडांगा, घोटी व डव्वा आणि सडक अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड व खोडशिवणीचा समावेश आहे.