गोरेगाव (गोंदिया) : मुदतबाह्य जलजीऱ्याचे सेवन केल्याने तालुक्यातील पाथरी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या ७ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास घडली. सर्व विद्यार्थिनींना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून सातही विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींमध्ये अर्चू नागेश कटरे, अंशिका जितेंद्र कडाम, निधी दीपक नागफासे, प्राची केशवराव येळे, स्वाती रोशन मेश्राम, चेतना नंदकुमार सांडीले व त्रिशा होमेंद्र चव्हाण या सात विद्यार्थिनींचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार पाथरी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचव्या वर्गाच्या विद्यार्थिनी गुरुवारी दुपारी जेवणाच्या सुटीत शाळेजवळील किराणा दुकानातून जलजीरा घेऊन आल्या. यानंतर वर्गात बसून त्याचे सेवन केले. त्यानंतर काही वेळातच या विद्यार्थिंनींचे पोट दुखायला सुरुवात झाली. सातही विद्यार्थिंनींना एकाच वेळी पोटात दुखायला लागल्याचे मुख्याध्यापिका अंजना हरिणखेडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या सर्व विद्यार्थिनींना कुऱ्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी या विद्यार्थिनींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी विद्यार्थिनींना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. सध्या सातही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुदतबाह्य जलजीऱ्याचे सेवन केल्याने त्यातून विद्यार्थिनींना फूड पॉयझनिंग झाल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले.
गावकऱ्यांमध्ये संतापाची लाटमुदतबाह्य जलजीरा सेवन केल्याने सात विद्यार्थिंनींना विषबाधा झाल्याचे विद्यार्थिनींच्या पालक व गावकऱ्यांना माहिती होताच त्यांनी रोष व्यक्त केला. तसेच मुदतबाह्य वस्तूंची विक्री करणाऱ्या किराणा दुकानदाराचा परवाना रद्द करुन दुकान बंद करण्याची मागणी लावून धरली. यामुळे गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गोरेगाव पोलिसांनी केली तपासाला सुरुवातदुकानदारांवर वेळेवर कारवाई झाली नाही, तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकते. प्रशासनाने कठोर पावले उचलावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या गंभीर घटनेची गोरेगाव पोलिसांनी दखल घेतली असून तपास कार्याला सुरुवात केली आहे.
"विद्यार्थिनींना अचानक पोटात दुखू लागल्यावर आम्ही वेळ न घालविता तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व विद्यार्थिनी सुरक्षित आहेत. आम्ही या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावी."
- अंजना हरिणखेडे, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी