६१ गावांत करणार नक्षल्यांना बंदी
By Admin | Updated: December 17, 2015 01:48 IST2015-12-17T01:48:20+5:302015-12-17T01:48:20+5:30
नक्षल चळवळ मोडीत काढणे गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये जनजागृती करीत ...

६१ गावांत करणार नक्षल्यांना बंदी
नरेश रहिले गोंदिया
नक्षल चळवळ मोडीत काढणे गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये जनजागृती करीत नक्षलवाद्यांना सहकार्य न करण्याचे धैर्य आणण्यात पोलीस आणि तंटामुक्त गाव समित्यांना यश येत आहे. यावर्षी पाच नक्षलग्रस्त गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा ठराव पारित केला. त्यामुळे गावबंदी करणाऱ्या गावांची संख्या ५३ झाली आहे. आणखी ६३ गावांत अशा पद्धतीची बंदी करण्याचे लक्ष्य पोलिसांनी ठेवले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अशा ११४ पैकी ५३ गावांत नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही, त्यांना सहकार्य करणार नाही, असा ठराव ग्राम पंचायतमध्ये पारित करून तो शासनाला पाठविला आहे.
जिल्ह्यातील ५५६ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी नोंद आहेत. या नक्षलग्रस्त गावातील जनता भयमुक्त राहावी यासाठी जिल्हा पोलिसांनी सन २००५ पासून आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य सुरू केले. आदिवासी तरूणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला. व्यायाम शाळा उघडल्या. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना, वृध्दांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून दिला.
सुरूवातीला आदिवासी नागरिक पोलिसांना सहकार्य करीत नव्हते. पण या सर्व सोयी सुविधा देण्यात आल्यामुळे आदिवासी नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आणि ते पोलिसांना सहकार्य करू लागले. त्यातच महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने पोलिसांच्या कार्याला बळ मिळाले. गावागावातील महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या प्रत्येक कामात सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. आदिवासी जनतेच्या मनात कायमचे घर करण्याचे काम गोंदिया जिल्हा पोलिसांनी केले. सन २००५ पासून आजपर्यंत केलेल्या अविरत मेहनतीमुळे जिल्ह्यातील ११४ पैकी ५३ ग्राम पंचायतींनी स्वयंप्रेरणेने नक्षलवाद्यांना आपल्या गावात बंदी करून विकासात्मक कार्याकडे पाऊल उचलले आहे. आता उर्वरीत ६१ गावांत नक्षलवाद्यांना बंदी करण्यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनामुळे सन २००५ या वर्षात पाच गावांत नक्षलवाद्यांना बंदी करण्यात आली.
प्रत्येक गावाला तीन लाख रुपये अनुदान
ज्या गावांनी नक्षल गावबंदी केली अशा प्रत्येक गावाला तीन लाख रूपयांचे अनुदान दिले जाते. गोंदिया जिल्ह्यातील ४८ गावांना एक कोटी ४४ लाख देण्यात आले आहेत. सन २०१५ या वर्षात मंजूर झालेल्या पाच गावांना १५ लाख रूपये लवकरच देण्यात येणार आहेत. या योजनेतून मिळालेला निधी गावाच्या विकासावर खर्च करण्यात येतो असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
तंटामुक्त मोहीम ठरली दुवा
पूर्व गावकरी पोलिसांना सहकार्य करीत नसल्यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांत वाढ झाली होती. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त मोहीमेमुळे नक्षलवाद्यांना जनतेपासून दूर जाण्यास बाध्य करण्यात आले. तंटामुक्त मोहीमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. परिणामी आदिवासी जनतेने नक्षलवाद्यांना सहकार्य करणार नाही असा पवित्रा घेत चक्क ग्रामसभेत ठराव घेतला. पोलीस व आदिवासी जनतेत समन्वय घडवून आणण्याचे काम महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने केले. ही मोहीम पोलीस व आदिवासी जनता यांच्यातील दुवा म्हणून पुढे आली आहे.
बंदीच्या गावात विकास कामे
नक्षलवाद्यांना बंदी केल्यानंतर गावांना मिळालेली प्रोत्साहन अनुदानाची रक्कम गावातील विकास कामांवर खर्च केली जाते. याचे आॅडीट करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांवर असते. गोंदिया जिल्ह्याला मिळालेल्या रकमेतून संबधित गावात पाणघाट दुरूस्ती, विहीर दुरूस्ती, बोअरवेल बनविणे, विहीरींचे बांधकाम, आंगणवाडी दुरूस्ती, नळ दुरूस्ती, तलाव खोलीकरण, व्यायाम शाळा बनविणे ही कामे करण्यात आली आहेत.