‘जय’च्या शोधार्थ ५६ पथक तैनात
By Admin | Updated: July 28, 2016 00:13 IST2016-07-28T00:13:51+5:302016-07-28T00:13:51+5:30
शेकडो किलोमीटरची भटकंती करूनही ‘त्या’चा रूबाब कायम राहायचा. त्याचा रूबाब पाहण्यासाठी हजारो पर्यटक त्याच्या

‘जय’च्या शोधार्थ ५६ पथक तैनात
रेड अलर्ट कायम : वनविभाग व वन्यजीवप्रेमीची शोधमोहीम सुरूच
संजय साठवणे/ शिवशंकर बावनकुळे साकोली
शेकडो किलोमीटरची भटकंती करूनही ‘त्या’चा रूबाब कायम राहायचा. त्याचा रूबाब पाहण्यासाठी हजारो पर्यटक त्याच्या अधिवासात धाव घ्यायचे. मात्र मागील दोन महिन्यापासून तो दिसेनासा झाल्यामुळे त्याचा अधिवास अस्तित्वहीन झाला आहे. ‘जय’च्या शोधासाठी वनविभाग रात्रंदिवस गस्तीवर आहे. यासाठी नागझिरा व नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात एकुण ५६ पथके तयार करण्यात आली असून एकूण २२४ कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र ‘जय’चा अजून शोध लागलेला नाही. या व्याघ्र प्रकल्पात रेड अलर्ट आहे.
जयचा जन्म नागझिरा अभयारण्यात नोव्हेंबर २०१० ला झाला होता व त्याने सन २०१२ - १३ ला नागझिरा अभयारण्य सोडल्याची वनविभागात नोंद आहे. नागझिरा अभयारण्यातून स्थलांतरण करून उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यात आल्यानंतर या अभयारण्याला ‘जय’ नामक वाघाने प्रसिद्धीच्या झोतात आणले. मात्र आता त्याचेच अस्तित्व शोधण्याची वेळ वनविभागावर आली आहे. ‘जय’च्या बेपत्ता होण्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.
मागील काही महिन्यांपासून उमरेड कऱ्हांडला या राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पातील जय नामक वाघ हा बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी वनविभाग दिवसरात्र एक करीत आहे. मात्र जयचा शोध लागला नाही. एवढेच नाही तर जयच्या गळ्यातील रेडीओ कॉलरही निष्क्रीय झाल्याने जयचा शोध लावण्यास अडचण होत आहे.
वनविभाग जवळपासची सर्वच जंगले शोधत आहे. सर्वच जंगलात हाय हलर्ट करण्यात आले आहे. जयचे नागझिरा अभयारण्य असल्यामुळे कदाचित जय हा माहेरघर असलेल्या नागझिरा अभयारण्यात तर आला नसावा अशी शंका वर्तविण्यात येत असून त्यादिशेनेही वनविभागाने शोधमोहीम आरंभिलेली आहे.
व्हॉटसअॅप, फेसबुकवरही शोध
जय बेपत्ता झाल्यापासून त्याच्या शोधासाठी गावोगावी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर व्हॉट्स अप व फेसबुकवरही जय शोधार्थ त्याचे फोटो व माहिती प्रसारित होत आहे.जयच्या गळ्यात बांधण्यात आलेला रेडीओ कॉलर निष्क्रीय झाल्याने वनविभागाची झोप उडाली. रेडीओ कॉलर कशाने निष्क्रीय झाला असावा याची माहिती कळू शकली नाही.
वनविभागाचे नागरिकांना आवाहन
‘जय’ संदर्भात कुठलिही माहिती मिळाल्यास ती जवळच्या वनकार्यालयात सांगून जय शोध घेण्यास सहकार्य करावे असे आवाहन नागझिरा प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक नरेश खंडाते यांनी केले आहे.
५० हजारांचे बक्षीस जाहीर
कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्डलाईफ (क्लॉ) या वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकारांच्या समूहाने जय च्या अस्तित्वाचे पुरावे देणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे रोख बक्षिस जाहीर केले आहे. जय च्या अस्तित्वाचे पुरावे देणाऱ्यांचे नाव आणि परिचय पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असे सांगितले.
‘पदचिन्ह’ही सापडले नाही
जय च्या शोधार्थ नागझीरा नवेगावबांध या व्याघ्र प्रकल्पात पदचिन्हाच्या साहाय्याने शोधाशोध सुरु आहे. मात्र सापडलेले पगमार्क हे लहान वाघांचे असुन हे पदचिन्ह ‘जय’चे नाही अशी माहिती आहे.
शिकाऱ्यांमुळे धोक्याची घंटा
वाघांचे स्थानांतरण शिकाऱ्यांमुळे धोक्याची घंटा ठरत असली तरीही नागझिरा अभयारण्यातील ‘जय’ने शेकडो किलोमिटरची भटकंती करत शिकाऱ्यांनाही आव्हान दिले. राष्ट्रीय महामार्ग नद्या पार करत तो उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात येऊन पोहचला. कधी महामार्गावर तर कधी कुठे तो पर्यटकांना दिसत राहिला. त्याचा या भटकंतीचा मागोवा घेण्यासाठी सप्टेंबर २०१५ मध्ये त्याला रेडीओ कॉलर लावण्यात आली. रेडीओ कॉलर लावल्यामुळे त्याच्या भटकंतीचे आणखी पुरावे वनखात्याला मिळत राहिले. कालांतराने ही रेडीओ कॉलर घट्ट झाल्यामुळे ती बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅमेरा ट्रॅपमध्येही महिन्यापासून त्याची प्रतिमा नाही. दूरपर्यंतच्या भटकंतीसाठी प्रसिद्ध जय या आधीही बरेचदा दिसेनासा झाला आहे. पण काही दिवसातच तो अभयारण्यात परतलेला होता.