५१ चिमुकल्यांना मिळाले आई-वडिलांचे छत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:31 IST2018-12-02T21:30:27+5:302018-12-02T21:31:55+5:30
मुलांच्या आश्रमशाळा, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल्स, दुकाने या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांवर करडी नजर ठेवून त्या मुलांमध्ये अपहरण झालेले किंवा बेपत्ता झालेले बालके ........

५१ चिमुकल्यांना मिळाले आई-वडिलांचे छत्र
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुलांच्या आश्रमशाळा, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल्स, दुकाने या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांवर करडी नजर ठेवून त्या मुलांमध्ये अपहरण झालेले किंवा बेपत्ता झालेले बालके तर नाहीत ना याचा शोध पोलीस आॅपरेशन मुस्कानच्या माध्यमातून घेत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्हा पोलिसांनी यापूर्वी राबविलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये ५१ चिमुकल्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. ज्यांचे आई-वडील नाहीत त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.
१ ते ३१ जुलै २०१५ या महिनाभरात पहिले आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले. या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेले २ मुले व १२ मुली अश्या १४ बालकांचा शोध घेण्यात आला. तर रेकार्ड व्यतिरिक्त १२ मुले व ५ मुलींचा असे १७ मिळून एकूण ३१ बालकांचा शोध पहिल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये लागला. १ ते ३१ जानेवारी २०१६ या महिनाभरात दुसरे आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.
या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेल्या एकाही बालकाचा शोध घेता आला नाही. परंतु रेकार्ड व्यतिरिक्त ३ मुले व ३ मुलींचा असे ६ बालकांचा शोध घेण्यात आला. १ ते ३० एप्रिल २०१६ या महिनाभरात तिसरे आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.
या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेल्या मुला-मुलींपैकी १ मुलगी व रेकार्ड व्यतिरिक्त १ मुलगा अश्या २ बालकांचा शोध घेण्यात आला.१ ते ३१ जून २०१६ या महिनाभरात चवथे आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.
या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेले ४ मुले तर रेकार्ड व्यतिरिक्त २ मुले व १ मुलगी असे ७ बालकांचा शोध घेण्यात आला. १ ते ३१ जुलै २०१७ या महिनाभरात पाचवे आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.
या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेले १ मुलगा व ३ मुली तर रेकार्ड व्यतिरिक्त १ मुलगी असा ५ बालकांचा शोध घेण्यात आला. पाचही आॅपरेशनमध्ये ५१ बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
आठ वर्षात ७८३ बालके परतली
गोंदिया जिल्ह्यात सन २०१० पासून ते ३० जून २०१५ या काळात बेपत्ता झालेल्या किंवा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेण्यात आला. या काळात २४७ मुले व ५११ मुली बेपत्ता झाल्या होत्या. काहींचा शोध लागला. काही स्वत:हून घरी परतले. सन २०१० ते ३० जून २०१५ या काळात जिल्ह्यातील २४८ मुले आणि ५०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या.त्यापैकी २३९ मुले व ४९३ मुली पोलिसांना सापडल्या होत्या. त्यानंतर राबविलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये ५१ बालके पोलिसांच्या हाती लागली आहेत.
बेपत्ता बालकांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करीतच आहे. परंतु रेल्वे गाडीत, गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन बालके संशयास्पद आढळले. त्यांच्या चेहºयावर भय वाटले अथवा ते स्वत:ला असुरक्षीत समजत असतील तर त्यांची तत्काळ माहिती पोलिसांना द्यावी.
हरिष बैजल
पोलीस अधीक्षक गोंदिया.