भाजपच्या ५१ इच्छुकांनी केले पक्षनिरीक्षकांसमोर शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: August 9, 2014 00:53 IST2014-08-09T00:53:17+5:302014-08-09T00:53:17+5:30
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ५१ लोकांनी शुक्रवारी पक्षाच्या निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या.

भाजपच्या ५१ इच्छुकांनी केले पक्षनिरीक्षकांसमोर शक्तिप्रदर्शन
गोंदिया : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ५१ लोकांनी शुक्रवारी पक्षाच्या निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या. यावेळी जिल्हाभरातील आपल्या समर्थकांसह त्यांनी हजेरी लावून शक्तिप्रदर्शनही करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पक्षाचे संघटनात्मक काम आणि विविध क्षेत्रात वाढलेल्या भाजपच्या प्रतिनिधींची संख्या पाहता गोंदिया विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडून भाजपकडे घेण्याची शिफारस वरिष्ठांकडे केली जात असल्याची माहिती निरीक्षकांनी पत्रकारांना दिली.
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.राम शिंदे आणि किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मते हे निरीक्षक म्हणून शुक्रवारी गोंदियाच्या दौऱ्यावर होते.
येथील अग्रसेन भवनात त्यांनी सकाळी ११ पासून चारही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांचे अर्ज भरून घेऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या.
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांपैकी तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव हे दोन विधानसभा मतदार संघ सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. भाजप-सेना युतीत गोंदिया वगळता उर्वरित तीनही मतदार संघातून भाजपचे उमेदवार निवडणूक लढतात. तर गोंदिया विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढतो. मात्र यावेळी गोंदिया विधानसभा मतदार संघ भाजपकडे घेण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे यावेळी दिसून आले. गोंदिया विधानसभा मतदार संघासाठी १४, तिरोडा विधानसभा क्षेत्रात १५, अर्जुनी मोरगाव विधानसभेसाठी १२ तर आमगाव विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी १० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. (जिल्हा प्रतिनिधी)