एका पोलीस ठाण्यावर ५० रेल्वेस्थानकांचा भार
By Admin | Updated: December 22, 2014 22:48 IST2014-12-22T22:48:40+5:302014-12-22T22:48:40+5:30
गोंदिया रेल्वे स्थानकाच्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ५० रेल्वे स्थानकांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. यात प्लॅटफॉर्म असलेल्या २१ रेल्वे स्थानकांचा समावेश असून इतर प्लॅटफार्म

एका पोलीस ठाण्यावर ५० रेल्वेस्थानकांचा भार
गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकाच्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ५० रेल्वे स्थानकांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. यात प्लॅटफॉर्म असलेल्या २१ रेल्वे स्थानकांचा समावेश असून इतर प्लॅटफार्म नसलेले किंवा लहान रेल्वे स्थानक आहेत. या पोलीस ठाण्यात केवळ ४० कर्मचारी-अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. हे केवळ ४० कर्मचारी-अधिकारी ५० रेल्वे स्थानकांचा भार कसे सांभाळत असतील? याची कल्पना न केलेलीच बरी.
गोंदिया रेल्वे पोलीस विभागाचे कार्यक्षेत्र रायपूर-नागपूर मार्गावर दर्रेकसा रेल्वे स्थानकापासून भंडारा रोड रेल्वे स्थानकापर्यंत जवळपास १५० किमीच्या अंतरापर्यंत आहे. तसेच चंद्रपूर मार्गावर वडेगाव रेल्वे स्थानक व बालाघाट जिल्ह्यापर्यंत येथील पोलिसांना काम सांभाळावे लागते. तसेच तुमसर रोड रेल्वे स्थानक ते तिरोडीपर्यंत एका वेगळ्याच मार्गावर या कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. तसेच गोंदिया रेल्वे स्थानकातून जवळपास ६० रेल्वे गाड्या दरदिवशी जातात. या गाड्यांमध्ये गुन्हे न घडले तर ठिक, परंतु गुन्हे घडले तर तपास व चौकशी करण्याची पाळी याच पोलीस कर्मचाऱ्यांवर येते. तपासकार्यासाठी त्यांना नेहमी राज्याच्या बाहेर जावे लागते. त्यासाठी एवढ्या कमी संख्येतील कर्मचाऱ्यांना निश्चितच तारेवरची कसरत करावी लागते.
गोंदियाच्या रेल्वे पोलीस ठाण्यात अधिकारी म्हणून एकमेव सहायक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र येथे कमीत कमी तीन पोलीस निरीक्षक पदाचे अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. उल्लेखनिय म्हणजे गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्याचे रेल्वे स्थानक नक्षल प्रभावित क्षेत्रात येते. त्यासाठी या स्थानकावर अधिक सावधगिरी बाळगण्याचा दबाबसुद्धा गोंदिया रेल्वे पोलिसांना सहन करावा लागतो. अशावेळी रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकचा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. परंतु ही समस्या सुटण्याची चिन्हे दिसून येत नाही. (प्रतिनिधी)