४१ मुले-मुली अजूनही बेपत्ताच
By Admin | Updated: July 9, 2015 01:17 IST2015-07-09T01:17:03+5:302015-07-09T01:17:03+5:30
हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आॅपरेशन मुस्कान प्रकल्प राबविण्यात येत आहे.

४१ मुले-मुली अजूनही बेपत्ताच
नरेश रहिले गोंदिया
हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आॅपरेशन मुस्कान प्रकल्प राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१० पासून ३० जून २०१५ या काळात बेपत्ता झालेले किंवा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुला-मुलींना शोधने सुरू आहे. या काळात बेपत्ता झालेले किंवा अपहरण झालेले ४१ बालके अजूनही बेपत्ता आहेत. यात ३० मुली तर ११ मुलांचा समावेश आहे.
मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भीक मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. १८ वर्षाखाली बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्यशासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी ह्या कामासाठी लावले आहेत. जुलै महिनाभर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांपैकी काही मुले यांच्या पालकांकडे परत आले असल्यास त्यांची खात्री करून त्या बाबतची माहिती अद्यावत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात नेमलेले विशेष पथक हे दररोज अश्या मुलांचा शोध घेऊन नियंत्रण कक्ष येथे माहिती देत आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांशी समन्वय ठेवून हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क अभियान जोमात सुरू आहे. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा स्वयंसेवी संस्थाची मदत घेत आहे. हरविलेल्या किंवा घरातून निघून गेलेली मुले-मुली सापडल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करताना छायाचित्र काढून प्रसारीत केली जाणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोंदिया जिल्हा पोलिसांनी बेपत्ता असलेल्या मुले-मुलींचा शोध घेतला आहे.
सन २०१० ते ३० जून २०१५ या काळात जिल्ह्यातील २४८ मुले तर ५०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी २३७ मुले व ४७७ मुली यापूर्वीच पोलिसांना मिळाले. आताही गोंदिया जिल्ह्यातील ११ मुले व ३० मुली बेपत्ता आहेत. या मुला-मुलींना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हाण आहे. या मुला-मुलींचा शोध लागल्याशिवाय आॅपरेशन मुस्कान अपयशी आहे.
आठवडाभरात १६ बालके मिळाली
गोंदिया पोलिसांनी १ जुलै पासून आॅपरेशन मुस्कान सुरू केला आहे. या अभियानात आठवडाभरात १३ मुले व ३ मुलींना शोधून काढले आहे. पोलिसांनी या अभियानाला यशस्वी करण्यासाठी राबविलेल्या मोहीमेचे हे फलीत आहे.
‘प्रेम’ फुलवितो आकडा
अल्पवयातच मुला-मुलींना प्रेमाचे आकर्षण होते. १४ ते १७ वर्ष वयोगटातील मुले-मुली संसार बसविण्याचा विचार करून घरून पळून जातात. आपल्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होईल हे मनाशी ठरवून गोंदिया शहरात शिकवणीला जाणाऱ्या अनेक मुली आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. काही दिवसात त्या मुली घरी परतल्यावर त्यांचे अपहरण नव्हते प्रेमप्रकरण होते असे उघडकीस आले. अल्पवयीन मुला-मुलींमध्ये प्रेमाची भूरळ घालून त्यांना पळविण्यात येत आहे. या प्रकारामुळे बेपत्ता, अपहरणाचा आकडा जिल्ह्यात फुलत आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रेमप्रकरणामुळे आकडे फुलत आहेत.