३५ गावांत ‘श्री’ पद्धतीने रोवणी
By Admin | Updated: August 24, 2015 01:47 IST2015-08-24T01:47:29+5:302015-08-24T01:47:29+5:30
अदानी फाऊंडेशनच्या वतीने तिरोडा तालुक्यातील एकूण ३५ गावांमध्ये श्री पद्धतीने धान पिकांची रोवणी करण्यात आली.

३५ गावांत ‘श्री’ पद्धतीने रोवणी
अदानी फाऊंडेशनचा उपक्रम : सेंद्रिय खत व कीड नियंत्रकांचा वापर
गोंदिया : अदानी फाऊंडेशनच्या वतीने तिरोडा तालुक्यातील एकूण ३५ गावांमध्ये श्री पद्धतीने धान पिकांची रोवणी करण्यात आली. कमी खर्चात अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना कसे मिळवून देता येईल, याच उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात जास्त उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी मोठीच कसरत करतो. त्यासाठी विविध रासायनिक खतांचा वापरही करती असतो. त्यामुळे पीक लागवडीचा अवाढव्य खर्च वाढला आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. लागवडीला जास्त खर्च लागूनही उत्पन्न पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे राहिले नाही. हाच मुद्दा लक्षात घेऊन अदानी फाऊंडेशनने कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळेल आणि ते निरंतर कसे मिळत राहील, यावर लक्ष वेधून सेंद्रीय खत व कीट नियंत्रकाचा वापर करून श्री पद्धतीने धान लागवडीचा उपक्रम हाती घेतला.
सदर उपक्रम राबविताना सर्वप्रथम गावागावांमध्ये शेतकऱ्यांच्या सभा घेण्यात आल्या. लाभार्थी शेतकऱ्याची निवड करण्यात आली. गाव पातळीवर कृषी विभाग तिरोडा व अदानी फाऊंडेशन तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना श्री पद्धतीने धान लागवड कशी करावी, त्याचे फायदे, पाण्याचे नियोजन तसेच सेंद्रिय शेती याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. हिरवळीचे खत, गांडूळ खत, शेणखत, कीटनियंत्रक दशपर्णी अर्क, अमृत पाणी, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र याविषयी परिपूर्ण प्रयोगात्मक माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणानंतर लगेच ‘सिरी ४०५’ हे सुधारित बियाणे शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच किलोप्रमाणे अदानी फाऊंडेशन तिरोडामार्फत देण्यात आले.
बियाणे पेरणी करताना गादीवाफा तयार करून शेतकऱ्यांनी लावावे, यासाठी गावागावात गादीवाफा तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. (प्रतिनिधी)
श्री पद्धतीने १,०५० शेतकऱ्यांची रोवणी
अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारे खडकी, सोनेगाव, नहरटोला, मलपुरी, करटी (खु), पुजारीटोला, एकोडी, धामनेवाडा, चिरेखनी, मरारटोला, बरबसपुरा, काचेवानी, करटी (बु), बिहिरीया, दांडेगाव, बेरडीपार, धादरी, उमरी, कवलेवाडा, लहान बेलाटी, जमुनिया, खमारी, इंदोरा (खु), बोदलकसा, सालेबर्डी, मांडवी, ठाणेगाव, पिंडकेपार, आलेझरी, बालापूर, चिखली, रूस्तमपूर, मुंडीपार, लोधीटोला अशा एकूण ३५ गावांमध्ये एक हजार ०५० शेतकऱ्यांसोबत श्री पद्धतीने धान लागवड उपक्रम राबविण्यात येत आहे.
श्री पद्धत व सेंद्रिय शेती
रोवणीच्या वेळी अदानी फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी गावातील एका लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन दोरीच्या साहाय्याने २५-२५ सेंमीवर रोपटे लावून रोवणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी प्रत्येक श्री पद्धत धान्य लागवड लाभार्थ्याला सेंद्रिय शेतीकडे प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने अदानी फाऊंडेशनद्वारे प्रत्येकी ५० किलोप्रमाणे गांढूळ खत वाटप करण्यात आले. तसेच कीटनियंत्रक तयार करण्यासाठी प्रत्येकांना प्लास्टिक ड्रम देण्यात येत आहे. गावातील उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतात रोवणीच्या वेळी जावून योग्य मार्गदर्शन करून आतापर्यंत एक हजार ५० शेतकऱ्यांच्या श्री पद्धतीने रोवण्या यशस्वीपणे करण्यात आल्या.