३२ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: January 1, 2015 23:03 IST2015-01-01T23:03:39+5:302015-01-01T23:03:39+5:30
अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) गोंदियाच्या सापळा कारवाईत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल पाच पटींनी वाढ झाली आहे. सन २०१४ मध्ये एकूण २७ सापळा कार्यवाही करून ३२ लाचखोरांवर

३२ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
वेलडन एसीबी : लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचाही समावेश
गोंदिया : अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) गोंदियाच्या सापळा कारवाईत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल पाच पटींनी वाढ झाली आहे. सन २०१४ मध्ये एकूण २७ सापळा कार्यवाही करून ३२ लाचखोरांवर सापळे रचून कारवाई करण्यात आली आहे. यात लोकप्रतिनिधींसह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
एसीबीच्या कारवाईत ग्रामविकास विभागाच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतमधील पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई करून सर्वाधिक गुन्हे दाखल करण्यात आले. त्या पाठोपाठ महसूल विभागात चार सापळा कारवाईत पाच आरोपी व पोलीस विभागात चार सापळा कारवाईत चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विद्युत विभागात तीन सापळा कारवाईत तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भूमी अभिलेख व वन विभागात प्रत्येकी दोन सापळा कारवाईत तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच परिवहन, आरोग्य, पशुसंवर्धन, सहकार व शिक्षण विभागात प्रत्येकी एका सापळा कारवाईत सात कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय एक सरपंच व एक कोतवाल यांच्याविरूद्ध लाचेचा यशस्वी सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे.
सन २०१४ मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईत वर्ग-१ चे तीन अधिकारी, वर्ग-२ चे पाच अधिकारी, वर्ग-३ चे १८ कर्मचारी, वर्ग-४ चे दोन कर्मचारी व इतर चार लोकसेवकांविरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
भ्रष्टाचाराची तक्रार करा
लाचेच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर तक्रारदाराचे संबंधित कार्यालयात प्रलंबित असलेले कायदेशीर काम पूर्ण करून देण्यासाठी एसीबीतर्फे पाठपुरावा केला जातो व तक्रारदाराचे काम पूर्ण करून दिले जाते. सापळा कारवाईकरिता तक्रारदाराकडून पुरविण्यात येणारी रक्कम सापळा कारवाईनंतर तक्रारदारास शासनातर्फे परत केली जाते. नागरिकांनी मोठ्या संख्येने भ्रष्टाचाराविरूद्ध तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन एसीबी गोंदियातर्फे करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)